विद्यार्थ्यांनो तयार राहा! पाच ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून

नीलेश डोये
Friday, 22 January 2021

शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना करण्यात येईल. यापूर्वी जिल्ह्यातील इयत्ता ९ ते १२ वीच्या शाळा सुरू केल्या असून, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्याही हळूहळू वाढत चालली आहे.

नागपूर : कोरोनामुळे बंद असलेले ५ वी ते ८ वीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा या उघडणार असून, विद्यार्थ्यांना पाठविण्याबाबत पालकांची लेखी संमती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

हेही वाचा - भाजपमध्ये लवकरच फाटाफूट! ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांचा पक्षाला राम-राम करण्याचा...

या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना करण्यात येईल. यापूर्वी जिल्ह्यातील इयत्ता ९ ते १२ वीच्या शाळा सुरू केल्या असून, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्याही हळूहळू वाढत चालली आहे. एकूण विद्यार्थी संख्येच्या ३५ टक्क्यांवर विद्यार्थी शाळेमध्ये हजर राहत आहेत. यापूर्वी ज्याप्रमाणे ९ ते १२ चे वर्ग सुरू करताना शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी शारीरिक अंतर ठेवणे, स्वच्छता राखणे, शाळेचे वेळापत्रक व इतर सर्व सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या होत्याच. त्याच सूचना ५ ते ८ च्या वर्गासाठी कायम राहणार आहेत. ग्रामीण भागामध्ये इयत्ता ५ ते ८ च्या १८१० वर शाळा असून, १ लाख ५० हजारावर विद्यार्थी संख्या आहे, तर १६ हजार १०० वर शिक्षकांची संख्या आहे. 

हेही वाचा - वय अडीच वर्ष अन् 'इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद, गुण ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क

शाळांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण - 
कोरोनाचा धोका लक्षात घेता जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामीण भागामध्ये सुरू होत असलेल्या शाळांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक शाळेला विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गण, सॅनिटायझर, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भित्तिपत्रके आदी वितरित करण्यात येतील, असेही कुंभेजकर यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fifth to eighth standard school starts from 27 january in nagpur