...अन्‌ पाहता पाहता आगीचे रौद्र रूप, उरली फक्‍त राख

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

व्यंकटेश कारखान्यात आग विझविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. शेवटी सकाळी ही आग विझविण्यात यश आले.अग्निशमन दलाचे जवळपास पन्नास कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी व्यस्त होते.

हिंगणा एमआयडीसी :  एमआयडीसी परिसरातील प्रिंटिंग इंक बनविणाऱ्या व्यंकटेश उद्योग कारखान्याला मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास आग लागली. त्यानंतर शेजारच्या साईनाथ पॅकेजिंग या कारखान्यालासुद्धा आगीने विळख्यात घेतले. आग बचावकार्य बुधवारच्या सकाळी 8 पर्यंत चालले. यात दोन्हीही कारखान्याचे शेड, मशीन, कच्चा व पक्का माल जळून खाक झाला. एकूण 25 कोटींचे नुकसान झाल्याची अंदाज वर्तविण्यात येत आहे.

अधिक वाचा  : आता ऐकू येतोय सगळीकडे मधूर किलबिलाट

25कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज
व्यंकटेश उद्योग या कारखान्याला मंगळवारी रात्री दीड वाजता अचानक आग लागली. सुरक्षारक्षकाला ही आग दिसताच त्याने कंपनीमालक व अग्निशमन दलाला माहिती दिली. एमआयडीसी वाडी अग्निशमन व नागपूर महानगरपालिकाच्या 4 गाड्या अशा एकूण आठ गाड्यातील फायर फायटर आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत होते. सुरुवातीला साईनाथ कंपनीतील आग आटोक्‍यात आली. परंतु, या कारखान्याचे
प्रोडक्‍शन युनिट पूर्ण जळून खाक झाले. सोबतच तयार मालसुद्धा जळाला. व्यंकटेश कारखान्यात आग विझविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. शेवटी सकाळी ही आग विझविण्यात यश आले.अग्निशमन दलाचे जवळपास पन्नास कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी व्यस्त होते.

अधिक वाचा : जनधन योजनेचा महिलांना थोडासा आधार, खात्यात जमा झाले पैसे

कारण अनभिज्ञ
आगीचे नेमके कारण अद्याप कळले नाही. व्यंकटेश उद्योग इंडिया प्रा. लि.चे मालक के. के. गुप्ता व साईनाथ पॅकेजिंग प्रा. लि. चे मालक अशोक बालानी घटनास्थळी हजर झाले. सहायक पोलिस आयुक्त सिद्धार्थ शिंदे, तहसीलदार संतोष खांडरे, एमआयडीसीचे दुय्यम पोलिस निरीक्षक राजेश पुकळे, उपनिरीक्षक नितीन मदनकर, तलाठी राधेश्‍याम सोनकुसरे, नीलडोह ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी गुणवंत चिमोटे यांनीसुद्धा घटनास्थळी येऊन पाहणी केली. या अग्नितांडवामध्ये सुमारे 25 कोटी संपत्तीची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A fire broke out in a factory in Nagpur district