नागपूर जिल्ह्यावर दुहेरी संकट; ‘सारी’चा उद्रेक, ४९० बळी

केवल जीवनतारे
Thursday, 3 December 2020

कोरोनाच्या रुग्णांची नोंद करीत असताना सारीच्या आजाराचा रुग्ण दगावल्यानंतर मात्र मेडिकलमध्ये नियमित नोंद घेण्यात येत आहे. मागील आठ महिन्यांत मेडिकलमध्ये साडेतीन हजारावर सारीचे रुग्ण आढळून आले आहेत.

नागपूर : मेडिकलमध्ये नऊ महिन्यांच्या कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात ‘सारी’ (सिव्हिअर ऍक्‍युट रेस्पिरेटरी इन्फेक्‍शन्स) आजाराच्या साडेतीन हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४९० सारीबाधितांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

जिल्ह्यात कोरोनासह सारीच्या नोंदीचे दुहेरी संकट घोंगावत आहे. मात्र, सारीच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाही याकडे प्रशासनाने फारसे लक्ष दिले नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) फेब्रुवारीपासून कोरोना आणि सारी आजाराच्या रुग्णांची नोंद होत आहे. तरीही सारी आजाराच्या रुग्णांची मात्र यंत्रणेकडून दखल घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. सारीच्या रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असून यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

जाणून घ्या - पोलिसांनी चक्क शेतकर्‍यांच वेश धारण करून केला जंगलात प्रवेश; पुढे आले हे वास्तव

कोरोनाच्या रुग्णांची नोंद करीत असताना सारीच्या आजाराचा रुग्ण दगावल्यानंतर मात्र मेडिकलमध्ये नियमित नोंद घेण्यात येत आहे. मागील आठ महिन्यांत मेडिकलमध्ये साडेतीन हजारावर सारीचे रुग्ण आढळून आले आहेत. विदर्भातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा विचार करता सुमारे सात हजारांवर रुग्णांची संख्या आढळून आली असावी असा अंदाज येथील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र, ही आकडेवारी पुढे आली नाही.

आरोग्य संचालकांचा फोन नुसताच खणखणतोय

नागपुरातील मेडिकलमधील सारी बाधितांची माहिती मिळाली. त्याच धर्तीवर राज्यातील जिल्हा रुग्णालय, ग्रामीण तसेच उपजिल्हा रुग्णालयातील माहिती घेण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाईल क्रमांक नुसताच खणखणत होता.

हेही वाचा - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला

प्रसार माध्यमांकडे केले होते दुर्लक्ष

एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे ‘सारी’ आजाराचेही रुग्ण राज्यात वाढले आहेत. राज्यात हा आकडा दहा ते बारा हजारांवर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आठवडाभरापूर्वी डॉ. पाटील यांनी नागपूरला भेट दिली. यावेळी प्रसार माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, नियमित भेट असल्याचे सांगत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींकडे दुर्लक्ष केले. विशेष असे की, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयातील नोंदीनुसार गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक तर त्या खालोखाल चंद्रपूर जिल्ह्यात सारीच्या आजाराची नोंद झाली आहे. मोबाईलवरून संपर्क न झाल्यामुळे आरोग्य विभागातील मृत्यूची आकडेवारी मात्र मिळू शकली नाही.

सविस्तर वाचा - शेतजमिनीला मोल येताच नात्यात कटुता, एक स्वाक्षरी लाखोंची

अशी आहेत लक्षणे

सारी आणि कोरोना या दोन्ही आजारांची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. सारीच्या रुग्णाला एकदम सर्दी, ताप येतो. तापाचे प्रमाण जास्त असते. शिवाय खूप अशक्तपणा येतो. न्यूमोनिया, श्‍वसन दाह, छातीत दुखणे, रक्त शुद्धीकरण क्षमता कमी होणे आदी लक्षणेही आहेत. बऱ्याच रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज पडते.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five hundred victims of sari in Nagpur district