हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले

PB01 PURSKAR.jpg
PB01 PURSKAR.jpg

नागपूर : माणूस स्वार्थी होत चालला आहे, हा आरोप पूर्वीपासून सततच होत आला आहे. काही प्रमाणात ते खरेही असेल, पण स्वार्थ सोडून परमार्थासाठी झिजणारेही कमी नाहीत. अशांच्या कार्याची नोंद घेणारा आणि निस्वार्थपणे समाजसेवा करणाऱ्यांचा सत्कार करणारा सोहळा सी. मो. झाडे फाऊंडेशनच्या माध्यमातून नुकताच पार पडला.
सी. मो. झाडे फाऊंडेशनने एक नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक, दिव्यांग-क्रीडा, आरोग्य, पत्रकारिता अशा तब्बल पाच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविले. "दै. सकाळ'चे सहयोगी संपादक प्रमोद काळबांडे यांना "सी. मो. झाडे पत्रकारिता पुरस्कार', छबन अंजनकर यांना डॉ. गोविंद समर्थ दिव्यांग सेवाकार्य पुरस्कार, लता राजपूत यांना मीराबेन शाह सामाजिक कार्य पुरस्कार, नरेंद्र पाटील यांना ना. बा. सपाटे आदर्श शिक्षक पुरस्कार, डॉ. प्रमोद पोतदार यांना डॉ. अतुल कल्लावार आरोग्यसेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, रोपटे आणि रोख दहा हजार रुपये असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
सी. मो. झाडे फाउंडेशनतर्फे संचलित सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्राच्या वातानुकूलित वास्तूचे उद्‌घाटनही यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून श्रमिक एल्गार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष ऍड. पारोमिता गोस्वामी, विशेष अतिथी सर्वोदयी विचारवंत ऍड. मा. म. गडकरी, आम्ही आमच्या आरोग्यासाठीच्या शुभदा देशमुख, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ. गिरीश गांधी म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्तीच्या सत्तर वर्षांनंतर मूलभूत गोष्टींवर चर्चा करण्याऐवजी व्यसनमुक्तीवर चर्चा करावी लागत आहे. याला आपण सर्व जबाबदार आहोत. कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे हे ठरविता आले पाहिजे. सरकार नावाची संस्था विसरल्याशिवाय आपण कुठलीही संस्था चालवू शकत नाही. सरकारच्या मदतीची अपेक्षा केल्यास कुठलेच काम होणार नाही. मूठभर चांगली माणसे जपण्याचे काम समाजाचे आहे.
या देशात अनेक महान नेते, संत, महात्मे होऊन गेले. त्यांनी आपापल्या परिने समाज दुरुस्त करण्याचे प्रयत्न केले. संतांनी समाजाला फक्त देण्याचे काम केले. समाजसेवेचे काम करणाऱ्याला काहीही अपेक्षा नसते. त्याला सात्त्विक सेवा म्हणतात. या देशात सेवकांची संख्या अल्प असली, तरी ती मोलाची आहे. आपण जे काम करतो, त्यात मन ओतले पाहिजे. सेवेमधून सहजभाव आला पाहिजे. मनुष्याचे जीवन अखंड सेवेसाठी आहे. समाजसेवेला जीवनाचे अंग मानले पाहिजे, असे विचार ऍड. मा. म. गडकरी यांनी व्यक्त केले.
ऍड. मा. म. गडकरी, नारायण समर्थ, प्रशांत सपाटे, अभय लांजेवार, अनिल आदमाने, बळवंत मोरघडे, डॉ. शिवराज देशमुख या निवड समितीने या पुरस्कारप्राप्त मान्यवरांची निवड केली. सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांतर्फे नरेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
ऍड. पारोमिता गोस्वामी म्हणाल्या की, व्यसनमुक्तीचे काम खूप कठीण आहे. व्यसनाची मागणी कमी करणे, हे खरे व्यसनमुक्तीचे काम आहे. दारूला आपल्याकडे राजाश्रय आहे. उत्पादनशुल्क विभागाला दारूचा खप वाढवा म्हणून उद्दिष्ट दिले जाते. याला विरोध व्हायला हवा. व्यसनमुक्ती केंद्र मला यासाठी आशादायी वाटते. व्यसनमुक्ती केंद्र उभारण्याचे काम सरकारचे आहे. व्यसनाच्या विरोधात एकत्रित येऊन काम करणे ही काळाची गरज आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी. मो. झाडे फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास झाडे यांनी केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com