अबब! टाळेबंदीत 93 लाखांची सुपारी जप्त

बुधवार, 3 जून 2020

कोरोना टाळेबंदीच्या कालावधीत गरीब स्थलांतरित मजुरांना जेवण पुरविण्यात येत होते. अशा 17 कम्युनिटी किचनची स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने तपासणी केली. त्यामुळेच अन्न विषबाधेसारख्या अप्रिय घटनांना योग्य प्रकारे आळा घालता आला.

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी देशात साठ दिवसांची टाळेबंदी असताना या कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात 93 लाख 58 हजार 945 रुपये किमतीची 28,979 किलो सुपारी जप्त केली. तसेच सुपारीसह रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल तेल, प्रतिबंधित अन्न पदार्थांचा 1 कोटी 16 लाख रुपयाचा साठाही विभागाने जप्त केला आहे. 

अन्न व औषध प्रशासन नागपूर कार्यालयाने कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदीत नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी अन्न पदार्थ मिळावे, यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले होते. यात अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील 175 प्रतिष्ठांना भेटी दिल्या. त्यातील दोन दुकानांना स्वच्छतेच्या कारणास्तव विक्री बंद करण्याचे प्रतिबंधित आदेश दिलेत. तसेच सुमारे 76 अन्न नमुने तपासण्यासाठी ताब्यात घेतले. 

रिफाइंड सोयाबीन तेल (सुमारे 972 किलो, किंमत 1 लाख 16 हजार 616 रुपये), रिफाइंड सूर्यफुल तेल (258 किलो, किंमत 27 हजार 837 रुपये), सुपारी (28,979 किलो किंमत 93 लाख 58 हजार 945 रुपये) तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थ (514 किलो, किंमत 5 लाख 15 हजार 615) एवढ्या किमतीचा साठासुद्धा जप्त केला. 

हेही वाचा : कशा ठरणार 'आशा' ग्रामीण भागाचा कणा?, वाचा काय झाला गैरप्रकार

कोरोना टाळेबंदीच्या कालावधीत गरीब स्थलांतरित मजुरांना जेवण पुरविण्यात येत होते. अशा 17 कम्युनिटी किचनची स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने तपासणी केली. त्यामुळेच अन्न विषबाधेसारख्या अप्रिय घटनांना योग्य प्रकारे आळा घालता आला. कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्यांना पुरविण्यात येत असलेल्या दोन्ही रुग्णालयांतील किचनचीही तपासणी करून आवश्‍यक त्या सूचना दिल्या होत्या. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त (अन्न) शरद कोलते व अभय देशपांडेसह अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी केली.