पाच हजारांची लाच मागणारे वनपाल, वनरक्षक अटकेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

कोरोनामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांना दिलासा देण्याऐवजी सरकारी कर्मचारी शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. शेतातील वृक्ष कापण्यासाठी पाच हजारांची लाच मागणारे वनपाल आणि वनरक्षकाला अटक केली आहे. 

नागपूर : शेतकऱ्याशी करार केल्यानंतरही शेतातील वृक्ष कापणे व खरेदी करण्याची परवानगी देण्यासाठी लाच घेणाऱ्या खापा वनपरिक्षेत्रातील वनपाल व वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी खापा येथे रंगेहात अटक केली. वनपाल किशोर सुखदेव निंबार्ते व वनरक्षक दशरथ खुशाल वानखेडे अशी अटकेतील अधिकाऱ्यांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यशोधरानगर भागात राहत असून तो कंत्राटदार आहे. त्याने वाकी येथील शेतकऱ्यासोबत शेतातील वृक्ष कापणे व खरेदी करण्याचा करार केला. वृक्ष कापण्यासाठी परवानगी आवश्‍यक असल्याने तक्रारदाराने वनविभागाकडे अर्ज केला. वृक्ष कापण्याची परवानगी देण्यासाठी दोघांनी अडीच हजार व उपवनसंरक्षक कार्यालयातील अधिकारी नाईक यांच्यासाठी अडीच हजार असे एकूण पाच हजार रुपयांची लाच तक्रारदाराला मागितली.

वाचा- दोघे सोबत आले, मिळून दारू प्यायले, क्षुल्लक कारणावरून झाला वाद आणि...

 तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अधीक्षक रश्‍मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सारंग मिराशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी सापळा रचला. लाच घेताच दोघांना अटक केली. दोघांविरुद्ध खापा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  कोरोनामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांना दिलासा देण्याऐवजी सरकारी कर्मचारी शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. शेतातील वृक्ष कापण्यासाठी पाच हजारांची लाच मागणारे वनपाल आणि वनरक्षकाला अटक केली आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: forest emplyees caught while taking bribe