बारावी नापास गुरनुलेच्या फसवणुकीचे देशभरात जाळे; कर्मचाऱ्यांना द्यायचा लाखो रुपयांचे वेतन 

अनिल कांबळे
Thursday, 26 November 2020

बारावी नापास विजय हाताखाली काम करणाऱ्यांना जवळपास ७५ हजार ते एक लाख रुपये महिना वेतन देत होता, अशी माहिती समोर आली आहे. 

नागपूर ः बारावी नापास असलेला विजय गुरनुलेने स्वप्नातही एका लाखाच्यावर रक्कम बघितली नव्हती. त्याला पैशाचा हिशेबही बरोबर करता येत नव्हता. परंतु त्याने दहा जणांची टोळी तयार करून संपूर्ण देशभरात हजारो गुंतवणूकदार तयार केले आणि शंभर कोटींपेक्षा जास्त रकमेचा स्कॅम केला.

बारावी नापास विजय हाताखाली काम करणाऱ्यांना जवळपास ७५ हजार ते एक लाख रुपये महिना वेतन देत होता, अशी माहिती समोर आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो व्हिजन बिल्डकॉन कंपनीचा संचालक विजय रामदास गुरनुले (वय ३९ रा. महाजनवाडी,हिंगणा) याला झटपट श्रीमंत बनायचे होते. त्यासाठी त्याने मोठा घोटाळा करण्याची योजना आखली. मात्र, तो घोटाळा करणे एकट्याचे काम नसल्याचे लक्षात आले. त्याने देवेंद्र भीमराव गजभिये (वय ३४, रा. तोरगाव खुर्द ता.ब्रह्मपुरी) याला हाताशी धरले आणि मेट्रो व्हिजन बिल्डकॉन नावाने कंपनी सुरू केली.

अधिक वाचा - पाण्याच्या कॅनलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; अवस्था बघून उपस्थितांच्या पायाखालची सरकली जमीन

मल्टी लेवल मार्केटींग असा फंडा तयार केला. स्वतः पैसे गुंतवा आणि आपले पैसे काढण्यासाठी अन्य लोकांना पैसा गुंतविण्यास भाग पाडा. गुंतवणुकदारांचा संख्या वाढवा आणि त्यांच्या पैशावर एंजॉय करा, या फंड्याप्रमाणे विजय आणि देवा दोघेही पुढे गेले. ५० लाखांचा घोटाळा करण्याचे टार्गेट ठेवले आणि कामाला लागले.

केवळ तीन महिण्यात त्यांनी ५० लाख कमावले. त्यामुळे दोघांना हाव सुटली. तोच हावरटपणा नडला. बिजनेस वाढायला लागताच त्यांनी कोट्यवधींचा हिशेब ठेवण्यासाठी दहा जणांची टीम तयार केली. ज्ञानेश्वर बावने, जीवनदास आनंदराव दंडारे,रमेश सूरजलाल बिसेन, अतुल युवराज मेश्राम, अविनाश महादेवराव महाडोले, राजू नागोराव मोहुर्ले, श्रीकांत केशव निकुरे आणि तन्मय जाधव यांचा समावेश केला. 

पैशाची आवक वाढली अन्... 

विजय आणि देवाचा फंडा एवढा पाप्युलर झाला की फक्त तीन महिन्यांत संपूर्ण महाराष्ट्रभर पोहचला. पैशाची अनपेक्षित आवक वाढली. दिवसाला लाखों रुपये खात्यात जमा व्हायला लागले. त्यामुळे विजयने अन्य राज्यात जाळे फेकण्याची आयडीया देवाला दिली. दोघेही झपाट्याने कामाला लागले. प्रत्येक राज्यातील मोठमोठ्या हॉटेलमध्ये सेमिनार सुरू केले. त्यामुळे अन्य राज्यातील हजारो गुंतवणुकदार कोट्यवधीने पैसे गुंतवायला लागले. 

सेकंड हॅंड बाईक ते अलिशान कार 

नागपूरचा विजय सुरुवातीला सेकंड हॅंड बाईकवर फिरत होता. कंपनी स्थापन केल्याच्या सहा महिन्यातच लाखोंनी पैसे खात्यात यायला लागले. त्यामुळे दुचाकीस्‍वार विजय थेट अलिशान महागड्या गाड्यात फिरायला लागला. बिझनेस क्लासचे तिकीट काढून विमानाने फिरायला लागला. कोट्यवधी जमा झाल्यामुळे थेट जमिनीत खड्डे करून पैसे ठेवायला लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पैसे मोजायला गणिताचा शिक्षक 

विजय गुरनुलेने केलेल्या फसवणुकीत सहभागी असलेल्या आणखी एका आरोपीला प्रतापनगर पोलिसांनी अटक केली. तन्मय जाधव (३७, रा. नंदनवन) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो एका शाळेत शिक्षक आहे. त्याला विजयने ७ लाख रुपये दिले होते. ती रक्कम पोलिसांनी जप्त केली. त्याला न्यायालयाने ३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: frauds of Gurnule was all over the India