एकाने 'साले भिकारी... ले खा पुरी...' म्हटलं तर दुसऱ्याने हसून टिंगल उडवली म्हणून केला हातोडीने हल्ला

A friend killed one
A friend killed one

नागपूर : "साले भिकारी... ले खा पुरी...' असे म्हटल्याचा राग अनावर झाल्याने युवकाने दोघांवर हातोड्याने प्राणघातक हल्ला केला. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या मित्रावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास लकडगंजमध्ये उघडकीस आली. कालू उर्फ लालचंद देविदास मेंढे (40) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 30 वर्षांचा कंडक्‍टर नावाचा युवक गंभीर जखमी आहे. विनोद सीताराम मोखे (40, रा. लालगंज, शांतीनगर) असे आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद मोखे हा एका कंपनीवर चौकीदार म्हणून कामाला आहे. त्याच परिसरात कालू मेंढे आणि कंडक्‍टर हे दोघेही हमाल म्हणून काम करतात. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता लकडगंजमधील जेके टॉवर बिल्डिंगसमोरील मेहता पेट्रोल पंपामागील रोडवरील फुटपाथवर कालू मेंढे आणि कंडक्‍टर उभे होते. दरम्यान तेथे जेवण वाटणाऱ्यांची गाडी आली. त्या दोघांनी जेवण घेतले आणि फुटपाथवर बसून खात होते. त्यावेळी आरोपी विनोद मोखे तेथे आला. तोपर्यंत जेवण वाटप करणारी गाडी निघून गेली होती. त्यामुळे विनोदने कालूला भूक लागल्याचे सांगून एक पुरी मागितली.

कालूने लगेच एक पुरी पुढे करून "भिकारी ले खाले पुरी...' असे हिनवले. कंडक्‍टरने मोठ्याने हसून टिंगल उडवली. भिखारी म्हटलं म्हणून विनोदचा पारा चढला. त्याने दोघांनाही शिवीगाळ केली तर त्यांनी विनोदला मारहाण केली. हे प्रकरण लकडगंज पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी त्यांची समजूत घालून विनोदला मेडिकलला तपासणीसाठी पाठवले. रात्री दहा वाजेपर्यंत तिघेही आपापल्या मार्गाने निघून गेले. 

मनातील खदखद काढली

भिकारी म्हटल्यामुळे विनोदच्या मनात खदखद होती. त्याने रात्री बारा वाजता कंपनीतील मोठा हातोडा घेतला. दोघांचाही शोध घेण्यासाठी तो बाहेर पडला. नमन आयर्न ऍण्ड स्टिल दुकानासमोरील रोडवर झोपलेल्या कालू आणि कंडक्‍टरवर हातोड्याने हल्ला चढविला. कालूच्या डोक्‍याला जबर मार बसल्यामुळे तो जागीच ठार झाला तर कंडक्‍टर बेशुद्ध पडला.

हातोडा घेऊन पोहोचला ठाण्यात

कालू आणि कंडक्‍टरला ठार केल्याची खात्री पटल्यानंतर आरोपी विनोद मोखे हा लकडगंज पोलिस ठाण्यात पोहोचला. त्याने ड्युटी अधिकाऱ्याला दोन मित्रांचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी लगेच त्याला ताब्या घेतले आणि घटनास्थळ गाठले. त्यापैकी कंडक्‍टरला लगेच मेडिकलमध्ये दाखल केले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे. 

तो हसला म्हणून...

विनोदला पुरी देतेवेळी कालू मेंढेने भिकारी म्हटले आणि त्याच वेळी कंडक्‍टर हा मोठ्याने खो-खो करून हसला. तो हसल्यामुळे अपमान झाल्याची खदखद विनोदच्या मनात होती. फक्‍त तो आपल्यावर हसला म्हणून त्याचाही गेम करायचा होता, अशी कबुली आरोपी विनोदने पोलिसांना दिल्याची माहिती आहे.

पोलिसांच्या निष्काळजीपणाचा बळी

शनिवारी सायंकाळी कालू मेंढे, विनोद मोखे आणि कंडक्‍टर यांचे भांडण आणि मारमारी झाल्यामुळे ते लकडगंज पोलिस ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांना कुणीही गांभीर्याने घेतले नाही. कालू आणि कंडक्‍टरविरुद्ध किरकोळ भांडण-मारहाणीची "एनसी' दाखल करून तिघांनाही हाकलून दिले. मात्र, त्याचवेळी लकडगंज पोलिसांनी धोका ओळखून गांभीर्य दाखवले असते तर कालूचा जीव वाचला असता आणि एवढी मोठी घटनाही घडली नसती, अशी चर्चा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com