बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार 

नरेंद्र चोरे
Monday, 19 October 2020

राज्यात महाराष्ट्र आणि विदर्भ अशा पॉवरलिफ्टिंगच्या दोन संघटना कार्यरत असून, त्यांच्यात अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. मात्र विदर्भ पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे अधिक वजन आहे. विदर्भ पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या माध्यमातून असंख्य बोगस प्रमाणपत्रांची विक्री झाल्याची माहिती आहे. शासकीय व निमशासकीय सेवेसाठीच्या पाच टक्के आरक्षणासाठी त्यांच्याच प्रमाणपत्राला मंजुरी आहे. याच मंजुरीचा फायदा घेत विदर्भ पॉवरलिफ्टिंग संघटनेने राज्यात बोगस प्रावीण्य प्रमाणपत्राची विक्री केलेली आहे.

नागपूर : बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणात बोगस खेळाडू आणि क्रीडा अधिकाऱ्यांना अटक झाल्यानंतर, आता या घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार व एक दलाल पोलिसांच्या रडारवर आहेत. या प्रकरणी अटक होण्याची शक्यता लक्षात घेता एकाने न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळून लावल्याने कोणत्याही क्षणी त्याला अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात महाराष्ट्र आणि विदर्भ अशा पॉवरलिफ्टिंगच्या दोन संघटना कार्यरत असून, त्यांच्यात अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. मात्र विदर्भ पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे अधिक वजन आहे. विदर्भ पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या माध्यमातून असंख्य बोगस प्रमाणपत्रांची विक्री झाल्याची माहिती आहे. शासकीय व निमशासकीय सेवेसाठीच्या पाच टक्के आरक्षणासाठी त्यांच्याच प्रमाणपत्राला मंजुरी आहे. याच मंजुरीचा फायदा घेत विदर्भ पॉवरलिफ्टिंग संघटनेने राज्यात बोगस प्रावीण्य प्रमाणपत्राची विक्री केलेली आहे. ट्रॅपोलिन प्रकारातील या प्रमाणपत्राच्या आधारावर आतापर्यंत अनेक बोगस खेळाडूंनी विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर शासकीय नोकऱ्या लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मानकापूर पोलिसांनी सांगलीच्या सावंत बंधूंना ताब्यात घेण्यात आले. याशिवाय या प्रकरणात मुख्यत्वे दोषी असलेले सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर आणि नागपूर उपसंचालक कार्यालयात कार्यरत क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांनाही अटक करण्यात आलेली आहे. 

 

हेही वाचा : *राज्यात मुष्टियोद्धे कसे घडतील? ३६ जिल्ह्यांमध्ये फक्त दोनच प्रशिक्षक, तरीही सरकारचं दुर्लक्ष*
 

 

सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या सावंत बंधूंना अटक झाल्याची कुणकुण लागताच आणि अटक होण्याची शक्यता लक्षात घेता विदर्भ पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचा सचिव डॉ. श्रीकांत वरणकर फरार झाला. दरम्यानच्या काळात वरणकरने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्जही केला. मात्र त्याच्याविरोधात तपास अधिकारी पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी भक्कम पुरावे सादर केले. सबळ पुराव्याच्या आधारावर न्यायालयाने शनिवारी त्याचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता वरणकरच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. कोणत्याही क्षणी वरणकरला अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात फरार असलेला दलाल कृष्णा बाबुराव जायभाळे याचाही पोलिस शोध घेत आहेत. मूळ बीडचा रहिवासी असलेला कृष्णा हा सांगलीच्या एका शाळेत शिक्षक असल्याची माहिती आहे. दैनिक 'सकाळ'ने राज्यातील बोगस खेळाडू व बनावट प्रमाणपत्रांचे हे गंभीर प्रकरण उचलून धरले असून, सातत्याने पाठपुरावा करीत आहे. 
 
 संपादन : प्रशांत रॉय 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fugitive Master in Fake Sports Certificate Case Absconding