परीक्षांसंदर्भात सिनेट, व्यवस्थापन परिषदेत चर्चा करा... कुलगुरूंना दिले पत्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जून 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून ज्यांना परीक्षा द्यायची आहे, त्यांची परीक्षा ऑक्‍टोबरमध्ये घेण्यात यावी अशी सूचना केली आहे. मात्र, यामुळे एक विद्यार्थी श्रेणी तर एक परीक्षा देऊन उत्तीर्ण होणार आहे. एकाच पदवीत दोन विद्यार्थी वेगवेगळ्या मार्गाने गेल्यास ज्याने परीक्षा दिली, त्याच्यावर अन्याय होणार आहे.

नागपूर : अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात राज्यपालांनी पत्र लिहून आपली भूमिका कळविली. मात्र, याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांवर होणार असल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी सिनेटची विशेष बैठक व व्यवस्थापन सदस्यांची बैठक बोलाविण्याची मागणी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य विष्णू चांगदे यांनी पत्राद्वारे प्रभारी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांना केली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून ज्यांना परीक्षा द्यायची आहे, त्यांची परीक्षा ऑक्‍टोबरमध्ये घेण्यात यावी अशी सूचना केली आहे. मात्र, यामुळे एक विद्यार्थी श्रेणी तर एक परीक्षा देऊन उत्तीर्ण होणार आहे. एकाच पदवीत दोन विद्यार्थी वेगवेगळ्या मार्गाने गेल्यास ज्याने परीक्षा दिली, त्याच्यावर अन्याय होणार आहे. त्यामुळे याबाबत विद्यापीठाने घाईने निर्णय घेऊन परिपत्रक वा दिशानिर्देश काढणे योग्य होणार नाही. त्यासाठी सर्वच प्राधिकरणातील सदस्यांचे मत यावर घेणे आवश्‍यक आहे. त्यामुळे यासाठी एकदा बैठक बोलावून त्यात सर्व सहमतीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत विष्णू चांगदे यांनी व्यक्त केले आहे. 

हेही वाचा : रात्री घरी उशिरा पोहोचल्याने घरचे रागावले; मग त्या मुलींनी घेतला हा निर्णय...

यावर लवकरच कुलगुरूंद्वारे बैठक बोलावण्यात येणार असल्याचे आश्‍वासन देण्यात आल्याचे समजते. दरम्यान, याचसंदर्भात ऍड. मनमोहन वाजपेयी आणि इतर सदस्यांनीही बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे 8 मे रोजी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षाची परीक्षा घेऊन इतर सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्यांना कॅरिऑन देण्याबाबत घोषणा केली होती. मात्र, राज्यातील कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता 31 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून मागील सेमिस्टरच्या निकालातील ऍव्हरेज गुणानुसार अंतिम सेमिस्टरचे मूल्यांकन करण्याचे आदेश काढले. याला अभाविप आणि इतर काही संघटनांनी विरोध केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gave a letter to the Vice-Chancellor