'होऊ कसे उतराई, ऋणातच राहू इच्छितो', डॉक्‍टर्सदिनी जाणून घ्या कोरोनामुक्‍तांच्या भावना 

Get to know the feelings of corona Patients on Doctor's Day
Get to know the feelings of corona Patients on Doctor's Day

नागपूर : 'कुठून सुरुवात करू, कसे आभार मानू, नाही मी आभार मानून डॉक्‍टरांच्या ऋणातून मुक्त होणार नाही. दुसरं आयुष्य त्यांच्यामुळे मिळालं यामुळे अखेरच्या श्‍वासापर्यंत या डॉक्‍टरांसह परिचारिका, वॉर्डबॉय, आरोग्यसेविका या सर्वांच्याच ऋणात राहू इच्छितो. कोरोनामुळे माझा जीव गेला होता. यांनी माझा जीव वाचवण्यासाठी दिलेल्या सेवेला मोल नाही. माझ्यासह माझ्या कुटुंबांसाठी ते "रिअल हिरो' ठरले आहेत. कोरोनाने मारण्याची तयारी केली होती, परंतु मरणाच्या दारातून परत आणणाऱ्या या देवदूतांना मी एवढेचं म्हणेन, सांगाहो... तुमचे उपकार मी कसे फेडू, हा जन्म पुरेसा नाही उत्तराई व्हायला... सांगा कसा होऊ उत्तराई... 

प्रसूतीच्या शस्त्रक्रियेपूर्वीची अवस्था माझ्या घरच्यांनी बघितली होती. शरीरात कोरोना आणि पोटात बाळं होतं... घरच्यांनी माझ्या जगण्याची आशा सोडली होती. मृत्यूच्या दारात गर्भातील बाळ आणि मी दोघेही होतो, परंतु मेयोतील डॉक्‍टरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्हाला दुसरा जन्म दिला. मी आणि माझी लेक पुन्हा जगू शकलो ते डॉक्‍टरांमुळे. माझ्यासाठी हे सारे डॉक्‍टर देवदूत आहेत. आयुष्यभर डॉक्‍टरांच्या ऋणात राहाणार आहे. या भावना आहेत, मेयो-मेडिकलमधून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या. 

कोरोना विषाणूच्या हल्ल्यानंतर डॉक्‍टरांवरचा गमावलेला विश्‍वास पुन्हा प्रस्थापित झाला आहे. तसाही डॉक्‍टर या घटकाबद्दल समाजात सर्वांनाच आदर आहे. नव्हेतर तो समाजापुढे आदर्श आहे. या कोरोनाच्या आणिबाणीच्या काळात जात धर्म पंथाच्या पलीकडची दृष्टी असणारा कोरानाचे संकट परतवून लावण्यासाठी पीपीई किटमध्ये अंगमेहनत करणाऱ्या मजुरासारखा घामाघूम होणारा हा देवदूतच आहे. या सेवावृती व्यवसायात काही "मायावृत्ती' शिरली हे खरे आहे, परंतु रुग्ण बरा व्हावा हीच भावना प्रत्येक डॉक्‍टरच्या मनात असते. हे मात्र नक्की. म्हणूनच तर नागपूरचा विचार करता जवळपास 1500 कोरोनाबाधितांवर उपचार करताना 1200 रुग्ण बरे झाले असल्याचे दिसून येते. 

कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयावह स्थितीत गळ्यात "स्टेथो' घेऊन कोरोनाबाधितांना हाताळत त्यांच्यावर उपचार करताना जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करण्यात सर्वात आघाडीवर आहेत ते निवासी डॉक्‍टर. ते तर सैनिकांचीच भूमिका निभावत आहेत. त्यांचा सेवाभाव खरोखरच कौतुकास्पद आहे. कोरोनाशी सुरू झालेल्या या कुरुक्षेत्रातील ते पांडव आहेत. मात्र कोविड हॉस्पिटल नावाच्या कुरुक्षेत्राच्या बाहेर राहून वारंवार दिवसातून पाच वेळा "कोविड हॉस्पिटल'मध्ये जीव मुठीत घेऊन प्रवेश करणारे मेडिकल आणि मेयोतील दोन योद्धे नजरेसमोर येतात. त्यांचे नाव डॉ. अविनाश गावंडे आणि डॉ. सागर पांडे. 

मेयो-मेडिकलमधून बरे होऊन निघाल्यानंतर कोरोनामुक्त रुग्णांना सल्ला देत त्यांच्यासाठी चालतेबोलते सल्ला केंद्र अर्थात डॉ. गावंडे आणि डॉ. पांडे यांचे मार्गदर्शन. सकाळी 10 वाजता वैद्यकीय कक्षात तैनात होणाऱ्या दोन योद्‌ध्यांना रात्री-मध्यरात्री नव्हेतर पहाटे मोबाईलवरून संपर्क साधला असता, ते उपलब्ध होतात. कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी तत्पर असतात. नव्हेतर कोरोनाकाळात प्रसारमाध्यमांचे समाधान करणारे हे योद्धे आहेत. डॉ. गावंडे यांच्याशी संवाद साधला असता, दुःखितांच्या चेहऱ्यावर उपचारानंतर उमटलेले हसू हीच आम्हा डॉक्‍टरांच्या कष्टाची शिदोरी आहे. वॉर्डात 24 तास सेवा देणारे निवासी डॉक्‍टर हेच खरे देवदूत आहेत. यामुळे समाजानेही आता वास्तवतेचे भान ठेवून डॉक्‍टरांचे संरक्षण करण्यासाठी पुढे यावे, ना की त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी. 

 
इतिहास "डॉक्‍टर्स डे'चा 

डॉ. बी. सी. रॉय यांच्या सन्मानार्थ "डॉक्‍टर्स डे' हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. त्यांचा जन्म 1 जुलै 1882 मध्ये झाला व निधन ऐंशीव्या वर्षी 1 जुलै 1962 मध्ये झाले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या सेवाधर्माचे योगदान लक्षात घेऊन 4 फेब्रुवारी 1961 रोजी त्यांना सरकाराने भारतरत्न सन्मानाने गौरविले. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे ते वैद्यकीय सल्लागार होते हे विशेष. पश्‍चिम बंगालचे मुख्यमंत्री पदही डॉ. राय यांनी भूषवले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com