व्यावसायिकांना महावितरणाचा ‘शॉक’ 

file photo
file photo

जलालखेडा (नागपूर) : कोरोना महामारी आली व सर्वांचे गणित बिघडले. यात वीज ग्राहकांचादेखील समावेश आहे. वीज बिलात दिलासा मिळावा यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले; पण यात ग्राहकांना दिलासा मिळाला तर नाहीच, पण आता त्यांच्याकडून वसुली केली जात आहे. 

कोविडमुळे लॉकडाउन लावण्यात आला. यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने ३१ मेपर्यंत बंद होती. या काळातील दुकानाचे स्थिर आकार माफ करण्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या व बिलात त्याची आकारणीसुद्धा करण्यात आली नव्हती. पण, आता हा आकार तर वाढविलाच व मागील माफ केलेला करही ऑगस्टच्या बिलापासून वसुली करण्यात आल्यामुळे व्यावसायिकांना महावितरणाचा जोराचा ‘शॉक’ दिला आहे. 

कोविडमुळे अनेकांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे. लॉकडाउन काळात वीजबिलात दिलासा देण्याची मागणी करण्यात आली होती. यामुळे अनेकांनी वीजबिलाचा भरणादेखील केला नव्हता. यात घरगुती व व्यावसायिक वीज ग्राहकांचा समावेश होता. महावितरण कंपनीने व्यावसायिकांची दुकाने लॉकडाउन काळात बंद असल्यामुळे त्यांना बंद कालावधीचे स्थिर आकार आकारण्यात येणार नाही, असा दिलासा दिला होता. पण आता त्यांच्याकडून ऑगस्ट महिन्याच्या वीजबिलापासून स्थिर आकाराची वसुली केली जात आहे. व्यावसायिक वीज ग्राहकांना दोन महिन्यांचे स्थिर आकार एकाच वेळी भाराने अनिवार्य करण्यात आल्यामुळे त्यांच्या बिलाची रक्कम वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. 

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी १२ एप्रिलला व्यावसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांचे स्थिर आकार तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याची घोषणा केली होती. यामुळे आता ते भरावे लागणार नाही, अशी ग्राहकांची अपेक्षा होती. पण आता महावितरण कंपनीने स्थिर आकाराची वसुली करणे सुरू केले आहे. इतकेच नव्हे तर मागील स्थिर आकार ३९१ ने वाढवून ४०३ रुपये करण्यात आला आहे. 

महावितरण कंपनीने आता व्यावसायिकांना जेरीस आणले आहे. बंद काळातील वीजबिल सरासरी आकारण्यात आले. त्यात दुसरा भुर्दंड म्हणजे स्थिर आकार माफ करण्याची वल्गना करून आता वसुली सुरू केल्यामुळे व्यावसायिकांमध्ये रोष पसरला आहे. यामुळे आता लोकशाही पद्धतीने निवेदन देण्यात येणार आहे. 
-गोपाल टेकाडे, अध्यक्ष, व्यापारी संघटना, नरखेड तालुका 

संपादन : मेघराज मेश्राम 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com