फक्त पंधरा हजारांत तुमच्या मुलाच्या प्रेमप्रकरणाचा निपटारा करून देतो, मग...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

प्रियकराने लग्नाचे आमिष देऊन नकार दिल्याने चिडलेल्या तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून आपल्याला न्याय मिळेल अशी आशा तिला होती. मात्र, पोलिस हवालदाराने प्रियकराच्या कुटुंबाला प्रकरण मिटविण्यासाठी पंधरा हजारांची मागणी केली. यानंतर पोलिस हवालदाराला लाच घेताना रंगहात अटक करण्यात आली. 

नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. तरुणाने तिला लग्नाचे आमिष दिले. यामुळे त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. तरुण तिला बाहेर फिरायल घेऊन जात होता. यामुळे त्यांचे प्रेम अधिकच घट्ट झाले. अचानक तरुणाने लग्नास नकार दिला. यामुळे चिडलेल्या तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु, हे प्रेमप्रकरण सोडविण्यासाठी पोलिस हवालदाराने लाच मागितली होती. हवालदार कैलास रामप्रसाद पवार याला एसीबीने अटक केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याची एक दिवसाची पोलिस कोठडी घेतली आहे.

सविस्तर वाचा - रांगेत लागून बँकेत खाते उघडले; मात्र रक्कम काही जमा होईचि ना...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी हद्दीत राहणाऱ्या एका तरुणीचे तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत बाहेर फिरायला नेले. त्यानंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. लग्नास नकार दिल्याने चिडलेल्या तरुणीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार केली. एमआयडीसीच्या ठाणेदारांनी मुलाची समजूत काढून तरुणीसोबत लग्न करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर तरुणाने विचार करून सांगतो, असे म्हटले होते. त्यानंतर हे प्रकरण चौकशीसाठी हवालदार कैलास पवार यांना सोपविले. 

19 डिसेंबर 2019 रोजी लाचखोर पोलिस हवालदार कैलास पवार आणि मदतनीस हवालदार गणेश रामजी चव्हाण यांनी पोलिस ठाण्यात आलेल्या प्रेम प्रकरणात समेट घडवून आणून प्रकरण मिटविण्यासाठी मुलाच्या नातेवाइकाची भेट घेऊन15 हजारांची मागणी केली. गणेश चव्हाण याने पोलिस ठाण्याजवळील चहाटपरीवर पैसे घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. ही माहिती पवार यास समजताच तो पळून गेला.

हेही वाचा - हे काय, जागेचा ताबा मिळण्यासाठी केली त्याने 'वीरूगिरी'

दरम्यान, पवार याने न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने त्याला सहा जानेवारीपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्यानंतर एसीबीच्या वतीने अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायाधीश व्ही. बी. कुळकर्णी यांनी पवार याचा अटकपूर्व जामीन रद्द केला होता. 

jail साठी इमेज परिणाम

एक दिवसाची पोलिस कोठडी

घटनेनंतर पवार फरार झाला होता. सर्व मार्ग बंद झाल्याने पवार सोमवारी एसीबीच्या कार्यालयाला शरण आला. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Havadar Pawar arrested for bribery in Nagpur