आजारी असाल तर रेल्वेप्रवास टाळा

शनिवार, 30 मे 2020

सध्या काोराेनाचा प्रभाव वाढत असल्याने ज्यांना हार्टचा आजार आहे त्यांनी सध्याच्या काळात रेल्वेने प्रवास करणे टाळा,असे आवाहन आज रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.

नागपूर : श्रमिक एक्‍स्प्रेसमधून प्रवासादरम्यान प्रवाशांचे मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. गंभीर स्वरूपाच्या आजारामुळे हे मृत्यू होत असले तरी त्यामुळे रेल्वेची प्रतिमा खराब होत आहे. ही बाब लक्षात घेऊन आता रेल्वे प्रशासनाने आजारी असाल तर रेल्वे प्रवास टाळा असे भावनिक आवाहन प्रवाशांना केले आहे.
 
रेल्वेने परिपत्रक काढून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कर्करोग, रोगप्रतिकारशक्ती कमतरता असणारे, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुले आणि 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी रेल्वे प्रवास टाळावा असे म्हटले आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले की, प्रवाशी सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. परंतु, त्यासाठी प्रवाशांचे सहकार्य अपेक्षित आहे. आपत्कालीन परिस्थितीत 139 आणि 138 वर संपर्क साधावा, सदैव आपल्या सेवेते तत्पर आहोत असे ते म्हणाले.

दलालास अटक
 दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील पथकाने आज महाल परिसरातील बडकस चौकात छापा टाकून रेल्वेच्या ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालाला अटक केली. प्रशांत पासवानी (33) रा. बडकस चौक, महाल असे दलालाचे नाव आहे. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तो बनावट आयडीचा उपयोग करीत अनधिकृतरित्या तिकीट काढून चढ्या दरात त्यांची विक्री करायचा. त्याच्याकडून 2 हजार 834 रुपये किमतीच्या दोन तिकीट हस्तगत करण्यात आले.