मुलांनो, शाळेत या... मराठी व हिंदी शाळांनाही चांगले दिवस!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा नर्सरीपासून सुरू करणे आवश्‍यक असल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या शिक्षण विभागाने काढला. यातून खासगी संस्थांच्या मदतीने महापालिकेच्या इंग्रजी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. खासगी संस्थांच्या मदतीने इंग्रजी शाळा सुरू केल्यास महापालिका शाळांतील शिक्षणाचा दर्जा वाढेल.

नागपूर : खासगी संस्थेच्या मदतीने सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यास महापालिकेच्या सभागृहाने सोमवारी मंजुरी दिली. याच धर्तीवर मराठी व हिंदी शाळांनाही संजीवनी देण्याची गरज व्यक्त करीत ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी याबाबत प्रयत्न करण्याची सूचना केली. महापौर संदीप जोशी यांनी या सूचनेसह इंग्रजी शाळांचा प्रस्ताव मंजूर केल्याने बंद होत असलेल्या महापालिकेच्या मराठी व हिंदी शाळांनाही चांगले दिवस येण्याची शक्‍यता आहे. 

महापालिकेची जीएम बनातवाला ही एकमेव इंग्रजी शाळा असून, दरवर्षी या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, महापालिकेच्या इतर शाळांमध्ये पटसंख्येचा आलेख सातत्याने घसरत आहे. विद्यार्थ्यांचा शोध घेण्यास गेलेल्या महापालिकेच्या शिक्षकांना बहुतेक पालक त्यांच्या पाल्यांना इंग्रजी शाळेत पाठविण्याचा आग्रह धरत असल्याचे आढळून आले. 

अधिक वाचा - फक्त पंधरा हजारांत तुमच्या मुलाच्या प्रेमप्रकरणाचा निपटारा करून देतो, मग...

मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा नर्सरीपासून सुरू करणे आवश्‍यक असल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या शिक्षण विभागाने काढला. यातून खासगी संस्थांच्या मदतीने महापालिकेच्या इंग्रजी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. खासगी संस्थांच्या मदतीने इंग्रजी शाळा सुरू केल्यास महापालिका शाळांतील शिक्षणाचा दर्जा वाढेल. परिणामी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पालकांच्या पाल्यांनाही दर्जेदार शिक्षण घेता येईल. 

संबंधित इमेज

त्यामुळे सहा विधानसभा क्षेत्रात सहा इंग्रजी शाळा खासगी संस्थेच्या मदतीने सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या शाळांसाठी पायाभूत सुविधा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन खर्च, पाठ्यपुस्तके, गणवेश, पोषण आहार, परिवहन व्यवस्था, खेळणी, डीजिटल वर्ग खोली, फर्निचर आदींसाठी सुरुवातीच्या वर्षाला दोन कोटी 66 लाख रुपयांचा खर्चाला सभागृहाने मंजुरी दिली. दरवर्षी वर्गवाढीनुसार वेतन आदीवर अंदाजे सात टक्के वाढीव खर्चालाही हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यातील निम्मा खर्च महापालिका करणार असून, निम्मा खर्च संबंधित खासगी संस्था करेल.

उघडून तर बघा - माणुसकीच्या दुनीयेत चमकला नाही हा "सितारा', संघर्ष वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

मराठी शाळा पुन्हा जिवंत होतील

इंग्रजी शाळा सुरू करण्याचे चांगले पाऊल महापालिकेने उचलले असून, मराठी व हिंदी शाळाही खासगी संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात याव्या, अशी सूचना ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केली. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग खाजगी संस्थांना चालविण्यासाठी व्यवस्थापन खासगी संस्थेचे हवे, शिक्षकांचे वेतन महापालिका करेल, त्यामुळे मराठी शाळा पुन्हा जिवंत होतील, असेही त्यांनी सांगितले. 

शिक्षकांवरील खर्चाची बचत होईल

प्रकाश भोयर यांनी महापालिकेचे 1,200 शिक्षकांतून दीडशे शिक्षकांना इंग्रजी शिक्षण देण्यास तयार करावे, अशी सूचना केली. त्यामुळे महापालिकेचा इंग्रजी शाळांसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या शिक्षकांवरील खर्चाची बचत होईल, असे ते म्हणाले. 

संबंधित इमेज

दीड दशकात शंभर शाळा बंद

पालकांचा इंग्रजी शाळांकडे कल वाढल्याने गेल्या दीड दशकात महापालिकेच्या शंभर शाळा बंद झाल्याचे स्पष्ट मत मनपा शिक्षण विभागाने नोंदविले आहे. 35 शाळांच्या इमारती रिकाम्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the help of a private institution, Marathi schools are also revived