घरी बसून कंटाळलात, नैराश्य आल्यासारखे वाटतेय? या तरुणांची घ्या मदत

depression
depression

नागपूर : अभय ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेला आणि लॉकडाऊनमध्ये तिथेच अडकला आता त्याला त्या हॉटेलची रुम खायला उठते आहे... विचित्र भास होतात... कोरोनाचा विषाणू त्यांच्या अंगावर फिरतोय असं वाटतं.. मग तो हात धुतो... परत परत धुतो... थोडा वेळ बरं वाटतं मग पुन्हा घर.. गाव.. मित्र सगळं आठवत राहतं... आपण कामामुळे घरी वेळच नाही दिला ही अपराधी भावना त्याला छळते आहे... आता तो हळूहळू नैराश्‍याकडे जातो आहे... 

सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. वाढता प्रादुर्भाव पाहता भारतात 21  दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या 21  दिवसांच्या काळात नागरिकांना घरीच राहावे लागत असून अभयसारखे अनेक जण घरी, बाहेर एकटे अडकून पडले आहेत. यामुळे अनेकांची घुसमट होते आहे. नैराश्‍यात गेलेल्या अशा व्यक्तींना व त्यांच्या दुखावलेल्या मनांना फुंकर घालण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणाईने अनोखी हेल्पलाईन सुरू केली असून "घुसमट मनाची, हितगुज आमच्याशी' याद्वारे नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम ते करीत आहेत. 

लहानपणापासून जगण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं हे आपल्याला शिकवलं, आपण तेच शिकलो. पण कोरोनामुळे जगण्यासाठी घरातच राहायची वेळ आली. यासाठी कधीच कोणी काही शिकवलं नसल्याने ते झेपणं बऱ्याच जणांना कठीण जातंय. कुणाला घरं असलं तरी घरपण नाही त्यामुळे घर खायला उठतयं, कुणाला पैशा अभावी घर कसं चालवावं या विचाराने घरात राहणं असह्य झालंय, कुणाच तरी नातं अगदी तुटायच्या टप्प्यात आहे आणि संपर्क संपलाय, घरी सगळे असल्यामुळे नात टिकवण्याची धडपड करता येत नाहीये, कुणीतरी परीक्षा आणि अभ्यासाच्या तणावामध्ये जातंय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरगुती हिंसाचाराचा सामना करणाऱ्या स्त्रियांची स्थिती आणखी गंभीर आहे, यात अनेकांना नवरा किंवा त्यांचे नातेवाईक यांचा त्रास सहन करावा लागतो मात्र संचारबंदीमुळे हे सर्व मुकाट्याने सहन करावे लागत आहे.

यामुळे नागरिकांची घुसमट होत असून ते नैराश्‍यात जात आहेत. हे नैराश्‍य दूर करण्यासाठी काही तरूण पुढे आले आहेत. घरी एकटे आहात.. तुमच्याशी बोलायला कुणी नाही तर आम्हांला फोन करा, असे आवाहन यातून करण्यात आले आहे. 

काय आहे संकल्पना 
सध्या संपूर्ण कुटुंब घरीच आहे. कोणी एकमेकांकडे जाऊ शकत नाही. काही कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे तर काही कुटुंबात संवादच हरवला आहे. दरम्यान, या काळात आपल्या स्वातंत्र्यावर गदा आल्याने अनेकांची घुसमट होते आहे. त्यांच्या जीवनातील ही घालमेल दूर करण्यासाठी जळगावातील अक्षय ठाकरे, विदर्भातील पियुष शिरोडे, भंडारा येथील रिचा बागडे आणि कल्याण, मुंबई येथील श्रद्धा देसाई या चौघांनी मिळून हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून ते लोकांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाय सुचवत आहेत.

समस्या गंभीर असेल तर त्यांना डॉक्‍टर व समुपदेशक यांच्याशी संवाद साधण्यास सांगत आहेत. यात त्यांना आसामचे डॉ. नीलेश मोहिते देखील मदत करीत आहेत. सध्या महाराष्ट्रात हे काम सुरू असून येत्या आठवड्यात हिंदी आणि इंग्रजी भाषेतून देखील नागरिकांना मदत केली जाणार आहे. 

आम्हाला कॉल करा
कुणालाही मानसिक दृष्ट्या कोणतीही गरज जाणवत असेल तर कोणत्याही संकोचाशिवाय हेल्पलाइनवर संपर्क साधू शकता. ही सेवा निःशुल्क आहे. यात कोणालाही नाव किंवा अन्य कोणतीही माहिती देण्याचे बंधन नाही. नागरिकांनी 8928580837, 9595391086, 8793469102 क्रमांकावर संपर्क साधावा अथवा फेसबुकवर "घुसमट मनाची, हितगुज आमच्याशी' या पेज वर व्यक्त व्हा. 
- पियुष शिरोडे


नैराश्‍याच्या दिशेने जातोय असं वाटतंय..? हे करा 
अशा परिस्थितीत तुम्ही कोणाशी तरी बोलायला हवं. तुम्हाला मदत हवी आहे, हे दुसऱ्यांना समजणं महत्त्वाचं आहे. 
जुने मित्र किंवा नातेवाईक यांच्याशी संपर्क करावा. जुने छंद जोपासा. तुम्हाला ते अशा वेळी उपयोगी पडतील. व्यायाम करा. भरपूर पाणी प्या. भरपूर सॅलड खा. काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. यामध्ये अगदी सोप्या सोप्या गोष्टीदेखील असू शकतात. उदा. तुम्ही उजव्या हाताने लिहित असाल तर डाव्या हाताने लिहायला शिका आणि डावखुरे असाल तर उजव्या हाताने लिहायला शिका. यामध्ये हस्तव्यवसाय, चित्रकला हेदेखील येऊ शकतं. तुम्हाला नैराश्‍य आलं आहे का हे तपासण्यासाठी बेक डिप्रेशन इन्व्हेंटरी (beck depression inventory) अशी एक टेस्ट असते. ती इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यातून आलेला निकाल गंभीर आहे, असं लक्षात आल्यास डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. 

हे टाळा 
शक्‍यतो एकटं राहू नका. जास्त टीव्ही बघू नका. तुमचं दु:ख कमी करण्यासाठी कोणत्याही व्यसनांच्या आहारी जाऊ नका. इंटरनेटवर पोर्नोग्राफी आणि इतर आमिषे दाखवणाऱ्या साइट्‌सवर जाऊ नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com