हिंगणा पंचायत समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा ताबा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांचे पुत्र दिनेश बंग यांची जिल्हा परिषद सदस्य म्हणून वर्णी लागली. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. कॉंग्रेस व शिवसेनेचा सुपडा साफ झाला. 

हिंगणा (जि.नागपूर) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच मतदारांचा कौल बदलला. सातपैकी जिल्हा परिषदेच्या चार जागा भाजपला तर तीन जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाल्या. 14 पंचायत समिती गणांत 8 जागा राष्टवादी कॉंग्रेसला तर 6 जागा भाजपला मिळाल्या. पंचायत समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने ताबा मिळविला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांचे पुत्र दिनेश बंग यांची जिल्हा परिषद सदस्य म्हणून वर्णी लागली. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. कॉंग्रेस व शिवसेनेचा सुपडा साफ झाला. 

क्‍लिक करा: गोल माल है भाई सब गोल माल है ! 

हिंगणा तालुक्‍यात जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात निवडणूक असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना व कॉंग्रेसने प्रचारात मोठी आघाडी घेतली. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पराभव झाला होता. भाजप आमदार समीर मेघे यांची वर्णी लागली होती. मात्र भाजपची सत्ता आली नाही. महाविकास आघाडी सत्तेत आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेने निवडणूक प्रतिष्ठेची केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्टार प्रचारक अमोल मिटकरी यांच्या प्रचारसभा घेतल्या. भाजपनेही प्रचारात मुसंडी मारली होती. विधानसभा निवडणुकीच्या वेळी असलेल्या वातावरणात बदल झाला. सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू झाली. तेव्हा रायपूर जिल्हा परिषद सर्कलमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिनेश बंग यांचा विजय झाला. भाजपचे विकास दाभेकर यांचा पराभव झाला. कॉंग्रेसचे बाबा आष्टणकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या विजयामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. खडकी जिल्हा परिषद क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उज्ज्वला बोढारे यांनी भाजपच्या वंदना पाल यांना पराभूत केले. नीलडोह जिल्हा परिषद क्षेत्रात भाजपचे राजेंद्र हरडे यांनी कॉंग्रेसचे संजय जगताप यांचा पराभव केला. डिगडोह जिल्हा परिषद क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुचित्रा ठाकरे यांनी भाजपच्या रश्‍मी कोटगुले यांचा पराभव केला. डिगडोह-इसासनी जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपच्या अर्चना गिरी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गीता हरिणखेडे यांचा पराभव केला. सातगाव जिल्हा परिषद क्षेत्रात भाजपच्या नीता वलके यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रेखा मसराम यांचा पराभव केला. टाकळघाट जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपचे आतिष उमरे यांनी कॉंग्रेसचे आनंद पाटील यांचा पराभव केला. 14 पंचायत समिती क्षेत्रात भाजपला सहा जागा तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 8 जागांवर विजय मिळविला.  भाजपने पंचवटी येथील जनसंपर्क कार्यालयासमोर आमदार समीर मेघे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित जि.प. सदस्य व पंचायत समिती सदस्य यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर जि.प. सदस्य दिनेश बंग यांची रायपूर गावात विजयी मिरवणूक काढण्यात आली. 

क्‍लिक करा : सांगा कसे जगायचे? आठ महिन्यांपासून खाण्याचेही वांधे 

मतदारांची नोटाला पसंती 
हिंगणा तालुक्‍यात सात जिल्हा परिषद क्षेत्रात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस व इतर अपक्ष उमेदवार रिंगणात असताना 1026 मतदारांनी नोटाचा हक्क बजावला. 14 पंचायत समिती क्षेत्रातील मतदारांनीही एकही उमेदवार पसंत नसल्याचा ठपका ठेवत 1672 मतदारांनी नोटाचा हक्क बजावला. यामुळे मतदारांची नोटाला होणारी मतदानाची टक्‍केवारी पाहता उमेदवारांना धोक्‍याची घंटा असल्याचे चित्र दिसून येत आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingana Panchayat Samiti occupies Nationalist Congress Party