हिंगणा तालुका अखेर जिल्हयातील सर्वात मोठा "हॉटस्पॉट', आतापर्यंत 32 रूग्ण आढळले...

HINGNA MIDC
HINGNA MIDC

हिंगणा एमआयडीसी (जि. नागपूर) : एमआयडीसी परिसरातील निलडोह, पारधीनगर, भीमनगर, गजानन नगर येथे बाधीते रूग्ण आढळल्यानंतर तातडीने परिसरातील हसीब फार्मास्यूटीकल्स कंपनीला टाळे ठोकण्यात आले. कारण या कंपनीतूनच संसर्ग वाढल्याचे कारण सांगण्यात येत आहे. आतापर्यंत तालुक्‍यात 32 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले. जिल्हयातील कामठी, कन्हान, भानेगाव नवीन वस्ती या भागात रूग्ण आढळल्यानंतर सुरक्षित असलेल्या हिंगणा तालुक्‍यात कोरोनाने चोरपावलांनी शिरकाव केला आहे. सर्वाधिक रूग्ण हिंगणा तालुक्‍यात आढळल्यामुळे जिल्हयात हिंगणा तालुका कोरोनाचा "हॉटस्पॉट' ठरला आहे.

एमआयडीसीतील झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव
एमआयडीसी परिसरात चोरपावलांनी कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एमआयडीसीतील झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधित क्षेत्राची शुक्रवारी पाहणी करून खातरजमा करून घेतली. शनिवारी(ता. 13) नीलडोह येथील सरपंचासह त्यांच्या कुटुंबातील आठ व भीमनगर येथील एकाला कोरोना झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे हिंगणा एमआयडीसी परिसराला कोरोनाने विळखा घातल्याचे दिसून येत आहे. हिंगणा तालुक्‍यात प्रथम कोरोनाचा रुग्ण लोकमान्यनगर परिसरात आढळून आला होता. या वृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर लोकमान्यनगरात सहा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.

आणखी वाचा : धंदयावर बसण्याची धमकी देणारी "लुटेरी दुल्हन' प्रीती दास पोलिसांच्या जाळयात

 59 जणांना क्‍वारंटाईन
गजानननगर, पारधीनगर, इसासनीमधील भीमनगर, वागदरा यांसह नीलडोह परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला. 12 जूनपर्यंत हिंगणा तालुक्‍यात 23 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांच्या पथकाने एमआयडीसी परिसरातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली होती. शनिवारी अमरनगर परिसरात अनेकांच्या संपर्कात आलेल्यां 59 जणांना क्‍वारंटाईन करण्यात आले. अनेकांचे स्वॅब नमूने घेण्यात आले. त्यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाली की नाही, हे सोमवारनंतर अहवाल आल्यावरच कळू शकते. आणखीही रूग्ण वाढण्याची शक्‍यता आहे.
महसूल, आरोग्य व पंचायत समिती प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या होत्या.

आणखी वाचा : नागपूरचे मिहान देखिल होतेय अनलॉक, हे उद्योग झाले सुरू

 प्रशासनाची डोकेदुखी वाढली
नीलडोह प्रथम नागरिकाच्या पतीस कोरोना झाला होता. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. याचा अहवाल आज शनिवारला आला. सरपंचासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य, भाडेकरू व ग्रामपंचायतमधील चपराशी असे आठ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल वैद्यकीय विभागाला प्राप्त झाला. त्यामुळे अमरनगर परिसरात प्रशासनाची चमू सकाळी दाखल झाली. कोविड तालुका नियंत्रण समितीचे सचिव उपविभागीय अभियंता जे. के. राव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे, तहसीलदार संतोष खांडरे, खंडविकास अधिकारी महेंद्र जुवारे, ठाणेदार हेमंत खराबे अमरनगरात दाखल झाले आहे. कोरोना रुग्ण आढळलेला परिसर सील करण्याची कारवाई सुरू आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एमआयडीसीतील एका कंपनीत कार्यरत होता. यामुळे या कंपनीतील कामगारांनही कोरोना झाला असावा, असा संशय बळावला आहे. सरपंचाच्या घरी राहणारा भाडेकरूही एका कंपनीत कार्यरत आहे. यामुळे त्याच्या संपर्कातही अनेक कामगार आल्याचे बोलले जात आहे. हिंगणा एमआयडीसी परिसरात अमरनगर व इसासनी परिसरातील भीमनगर या दोन मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. यामध्येच कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता हिंगणा एमआयडीसी परिसर कोरोनाचा "हॉटस्पॉट' भविष्यकाळात ठरणार का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

 जिल्ह्यात हिंगणा तालुका आघाडीवर
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 13 तालुके आहेत. हिंगणा एमआयडीसी सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत आहे. हिंगणा तालुक्‍यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 31 वर पोहोचली आहे. तालुका कोरोनाच्या बाबतीत जिल्ह्यात आघाडीवर आहे. या वसाहतीतील 100 टक्के कंपन्या सुरू झाल्या आहेत. या कंपन्यांमध्ये 60 टक्के कामगार कामावर येत आहेत. जिल्हा प्रशासनाने उद्योगांच्या व्यवस्थापनाला हाताशी धरून परवानगी दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. कंपन्यांमध्येही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. याकडे जिल्हाधिकारी महोदयांनी दुर्लक्ष केल्याने हिंगणा एमआयडीसी परिसर कोरोनाचा "हॉटस्पॉट' होणार एवढे मात्र निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com