घरची वाट धरणाऱ्या दाम्पत्यावर काळाचा घाला; अपघातात पती ठार तर पत्नी जखमी

चंद्रकांत श्रीखंडे
Thursday, 22 October 2020

सुसुंद्री गाव पार केल्यानंतर सुरेश नागपूरे यांच्या शेताजवळ पोहोचले असता विरुद्ध दिशेने मोहपा येथून सुसुंद्रीकडे भरधाव येत असलेल्या मालवाहूने समोरून जबर धडक दिली़. यात दुचाकी रस्त्याच्या बाजूला फेकली गेली़. अपघातात मदन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर मागे बसलेल्या त्रिवेणी या गंभीर जखमी झाल्या.

कळमेश्वर (जि. नागपूर) : दिवसभर कंपनीत काम करून सायंकाळी दुचाकीने डबलसीट घराच्या दिशेने निघालेल्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला़. गावाजवळ पोहोचण्याआधीच विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव मालवाहूने जबर धडक दिल्याने पती घटनास्थळीच मृत्युमुखी पडले, तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना सुसुंद्री शिवारात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदन तेजराम पांडे (वय ४०) असे मृत पतीचे तर त्रिवेणी मदन पांडे (वय ३५) रा. मोहपा असे जखमी पत्नीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी मंगळवारी सकाळी दोघेही पती-पत्नी नागपूर-काटोल मार्गावरील उबगी येथील कंपनीमध्ये कामावर गेले होते. सायंकाळी घराच्या दिशेने दुचाकीने मोहपा येथील घराकडे निघाले.

जाणून घ्या - सर्तक रहा, आणखी पाऊस येणार म्हणजे येणार!

सुसुंद्री गाव पार केल्यानंतर सुरेश नागपूरे यांच्या शेताजवळ पोहोचले असता विरुद्ध दिशेने मोहपा येथून सुसुंद्रीकडे भरधाव येत असलेल्या मालवाहूने समोरून जबर धडक दिली़. यात दुचाकी रस्त्याच्या बाजूला फेकली गेली़. अपघातात मदन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर मागे बसलेल्या त्रिवेणी या गंभीर जखमी झाल्या.

अपघातानंतर आरोपी मालवाहू चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढला़. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिकाच्या मदतीने जखमी महिलेला मोहपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात ‘रेफर’ करण्यात आले़. घटनास्थळाचा पंचनामा करून मदनचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

सविस्तर वाचा - अर्ध्यारात्री बोलावले तरी यावेच लागेल!, श्रीमुखात लगावली

परिसरात हळहळ

पांडे दाम्पत्याकडे शेती किंवा इतर कुठलाही व्यवसाय नाही. घरी मदनचे आई-वडील १३ व ८ वर्षाच्या दोन मुली आहे़त. त्रिवेनी व मदन दोघेही नागपूर-काटोल मार्गावरील एका कंपनीत कामावर होते. त्याच्या भरोशावर त्यांच्या संसाराचा गाडा चालायचा. कामावरून चिमुकल्या मुलींच्या ओढीने घराच्या दिशेने निघालेल्या दाम्पत्यावर अशा अचानक झालेल्या काळाच्या घाल्यामुळे मोहपा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband killed and wife injured in road accident