क्राईम पेट्रोल बघून पतीच्या हत्येचा कट; दाम्पत्यावरील हल्ल्याचा पर्दाफाश, प्रियकर गजाआड

Husbands murder plot after seeing crime patrol
Husbands murder plot after seeing crime patrol

नागपूर : क्राईम पेट्रोल बघून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान उघडकीस आली. गोरेडवाडा भागात झालेल्या दाम्पत्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या घटनेचा पर्दाफाश करून गिट्टीखदान पोलिसांनी प्रेयसी व प्रियकराला अटक केली. राजश्री राकेश डेकाटे व तिचा प्रियकर रजत श्यामराव सोमकुंवर (वय २८, रा. नीलगाव, कळमेश्वर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. रजत हा टाइल्स फिटिंगचे काम करतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गत सहा वर्षांपासून राजश्री व रजतचे प्रेमसंबंध आहे. दरम्यान, इच्छेविरुद्ध राजश्रीचे राकेश डेकाटे (वय ३३) यांच्यासोबत लग्न झाले. त्यांना चार वर्षांचा मुलगा वैष्णव आहे. लग्नानंतरही राजश्रीचे रजतसोबत प्रेमसंबंध सुरू होते. प्रेमात राकेश हा अडसर ठरत होता. प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी राजश्रीने रजतच्या मदतीने राकेश यांच्या हत्येचा कट आखला.

क्राईम पेट्रोल बघून राकेश यांना कसे संपवायचे याची योजना राजश्रीने आखली. योजनेनुसार माहेरी कार्यक्रम असल्याचे राजश्रीने राकेश यांना सांगितले. मंळगवारी सकाळी राजश्री ही पती राकेश व मुलासह धापेवाडा येथे गेली. दुपारी ती रजत याला भेटली. गोरेवाडा भागात राकेश यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा कट आखला.

रात्री राकेश हा राजश्री व वैष्णवसह मोटरसायकलने नागपूरकडे परत येत होता. गोरेवाडा भागात वैष्णवला उलटी आल्याचे सांगून राजश्रीने राकेश याला मोटरसायकल थांबवायला लावली. यानंतर राजश्री वैष्णवला रस्त्याच्या बाजूला घेऊन गेली. याचवेळी मोटरसायकलवर रजत आला. त्याने तोंडाला दुपट्टा बांधला होता. रजत याने आधी रॉड राजश्रीच्या अंगावर मारला. तिच्या मदतीसाठी राकेश धावला.

रजत याने राकेश याच्या पोटात चाकू खुपसला व मोटरसायकलस्वार पसार झाला. राजश्री यांनी आरडाओरड केली. यामुळे नागरिक जमले. एका नागरिकाने गिट्टीखदान पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी राकेश यांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गिट्टीखदान पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com