नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी, सलून, स्पाबाबत आला हा निर्णय...

सोमवार, 1 जून 2020

खासगी कार्यालयांना 8 जूनपासून कामास सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मात्र कामाच्या ठिकाणी केवळ 10 टक्के कर्मचाऱ्यांना काम करू देण्यास परवानगी असेल. इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावे लागेल.

नागपूर : शहरात 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रवगळून इतर भागातील नागरिक, दुकानदार, खाजगी कार्यालयांना टप्प्या-टप्प्याने दिलासा देण्यात आला आहे. मात्र पुढील आदेशापर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल, शाळा, कॉलेज, प्रशिक्षण संस्था, मेट्रो रेल्वे, शहर बससेवा, सिनेमा थिएटर, सभागृह, धार्मिक स्थळे, तसेच सलून, स्पा, ब्युटी पार्लर बंदच राहतील, असे आदेश महानगरपालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी दिले.

राज्य सरकारने काल, रेड झोनमधील महापालिका क्षेत्रातही काही बाबींना टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचे आदेश काढले. आज आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील दुकानदार तसेच नागरिकांना दिलासा देणारे आदेश काढले. या आदेशाची अंमलबजावणी 3 जूनपासून होणार आहे. परंतु प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाउनचे कडक पालन केले जाणार असून, तेथे सध्या कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. चौथ्या लॉकडाउनमध्ये शहर रेड झोनमध्ये होते. आता पाचवा लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढविण्यात आला असला तरी रेड झोनमधील नागपूर शहरात काही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यात 3 जूनपासून खाजगी, सरकारी मैदाने उद्याने सुरू होणार असून नागरिकांना सकाळी 5 ते सायंकाळी 7 याकाळात आरोग्याच्या दृष्टीने सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉकिंगसाठी परवानगी आहे. मात्र मैदान, उद्यानांत समूहाने फिरणे, व्यायाम करण्यासारखी कुठलीच कृती करता येणार नाही. लहान मुलासोबत पालकांना राहणे आवश्‍यक आहे. दुसऱ्या टप्प्यात 5 जूनपासून रस्त्याच्या एका बाजूची सर्व दुकाने दिवसाआड सुरू ठेवता येईल.

यासाठी सकाळी 9 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतची वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. टॅक्‍सी, कॅब आणि रिक्षा यांनाही 5 जूनपासून परवानगी असेल. मात्र यात चालक आणि दोन प्रवासी राहतील. खासगी कार्यालयांना 8 जूनपासून कामास सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मात्र कामाच्या ठिकाणी केवळ 10 टक्के कर्मचाऱ्यांना काम करू देण्यास परवानगी असेल. इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावे लागेल. असे असले तरी आदेशापर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल, शाळा, कॉलेज, प्रशिक्षण संस्था, मेट्रो रेल्वे, शहर बससेवा, सिनेमा थिएटर, सभागृह, धार्मिक स्थळे, तसेच सलून, स्पा, ब्युटी पार्लर बंदच राहतील