चिंता करू नका, वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांना मिळाली ही सोय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जून 2020

घरगुती वीजग्राहकांना जून महिन्यात आलेल्या एकत्रित बिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून घेता येईल

नागपूर : लोन घेतल्यानंतर ईएमआयची सोय असते. अनेक ग्राहउपयोगी वस्तु घेतल्यानंतरही ईएमआय सोय उपलब्ध करून देण्यात येते. अशीच व्यवस्था आता वीज ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. घरगुती वीजग्राहकांना जून महिन्यात आलेल्या एकत्रित बिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून घेता येईल, अशी घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मुंबईतून केली. यानिर्णयामुळे अडचणींचा सामना करणाऱ्या सामान्य वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जूनमध्ये देण्यात येत असलेली वीजबिले लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी वापरलेल्या युनिटप्रमाणेच आहे. ग्राहकांवर कोणताही भुर्दंड लादलेला नाही. वीजबिलाची घरबसल्या पडताळणी करण्यासाठी महावितरणने https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ ही विशेष लिंक उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतरही शंका असल्यास महावितरणच्या कार्यालयात जाऊन बिलाची आकारणी समजून घेता येईल. तसेच ग्राहकांना मीटर रीडिंग चुकल्याने किंवा अन्य कारणाने चुकीचे वीजबिल गेले असल्यास ते दुरुस्त करण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. राऊत यांनी दिली.

वाचा - महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी ऊर्जामंत्र्यांची मोठी घोषणा

लॉकडाउनमध्ये मीटर रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीजबिल देण्यात आले. जूनमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी मीटर रीडिंग घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मार्चनंतर प्रथमच थेट जूनमध्ये मीटर रीडिंग घेण्यात येत आहे. त्यामुळे मार्चपासून ते जूनमध्ये रीडिंग घेईपर्यंत एकूण वीजवापराचे एकत्रित व अचूक बिल ग्राहकांना देण्यात येत आहे. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल असल्याने स्लॅब बेनिफिट देण्यात येत आहे. तसेच ग्राहकांनी एप्रिल व मेमध्ये सरासरी वीजबिलांची रक्कम भरली असल्यास त्या रकमेचे समायोजन करण्यात येत आहे. चुकीच्या बिलाची दुरुस्तीसाठी तत्परतेने कार्यवाही करण्यात यावी व ग्राहकांना चुकीच्या वीजबिलांचा कोणताही त्रास होऊ नये, अशा सूचना महावितरणला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Instalment Facility for customer to pay electric bill