पश्‍चिम विदर्भातील सिंचन अनुशेष 1.63 लाख हेक्‍टर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

अमरावती विभागाचा अनुशेष दूर वर्ष 2022 पर्यंत दूर करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या असलेला अनुशेष दूर करण्यासाठी आणखी 15,488 कोटींची आवश्‍यकता आहे. यापैकी जिगाव प्रकल्पाचीच नवी सुधारित प्रशासकीय मान्यता 13 हजार कोटींची आहे. यासोबतच बळीराजा जलसंजीवनी व प्रधानमंत्री कृषी संजीवनी योजनेमधून केंद्रीय अर्थसहाय्य व नाबार्ड कर्जाद्वारे अतिरिक्त निधी उभरण्यात येत आहे.

नागपूर : राज्यात सिंचनचा विषय नेहमीच चर्चेत राहतो. सिंचन घोटाळ्यावरून नुकतेच एसीबीकडून गुन्हे दाखल करण्यात आलेत. नागपूर विभागातील सिंचनाचा अनुशेष संपल्याचा दावा करण्यात येत असताना दुसरीकडे अमरावती विभागील सिंचनाचा अनुशेष अद्याप कायम आहे. अमरावती विभागात 1 लाख 63 हजार हेक्‍टर सिंचनाचा अनुशेष शिल्लक असून तो दूर करण्यासाठी 15,488 कोटी रूपयांची आवश्‍यकता आहे, अशी माहिती विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती यांनी आज पत्रपरिषदेत दिली.

अवश्य वाचा - जॉनी लिव्हर म्हणतात, नागपुरचे लोकं लय भारी!

अमरावती विभागाचा अनुशेष दूर वर्ष 2022 पर्यंत दूर करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या असलेला अनुशेष दूर करण्यासाठी आणखी 15,488 कोटींची आवश्‍यकता आहे. यापैकी जिगाव प्रकल्पाचीच नवी सुधारित प्रशासकीय मान्यता 13 हजार कोटींची आहे. यासोबतच बळीराजा जलसंजीवनी व प्रधानमंत्री कृषी संजीवनी योजनेमधून केंद्रीय अर्थसहाय्य व नाबार्ड कर्जाद्वारे अतिरिक्त निधी उभरण्यात येत आहे. अनुशेष निर्मूलन कार्यक्रमांतर्गत समाविष्ट प्रकल्पांपैकी मोठे प्रकल्प पंतप्रधान कृषी संजीवनी योजना अंतर्गत व 41 प्रकल्प बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे. अनुशेषांतर्गतच्या एकूण 102 प्रकल्पांपैकी 81 प्रकल्पांना सधारित प्रशासकीय मान्यत मिळाल्या आहेत, 2 प्रकल्पात प्रतिक्षेत आहे, 3 प्रकल्पांचे प्रस्ताव त्रिसदस्यी समितीकडून मंजूर झाले आहेत. 15 प्रकल्पांमध्ये वन विभागाची मान्यता असून 12 प्रकल्पांना अंतिम मान्यता मिळाली आहे. 3 प्रकल्प शिल्लक आहेत, असे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला विदर्भ विकास मंडळाचे सदस्य सचिव हेमंतकुमार पवार उपस्थित होते.

अनुशेष दूर करण्यासाठी वर्षनिहाय उपलब्ध निधी व झालेला खर्च

  • वर्ष उपलब्ध निधी (कोटीत) खर्च (कोटीत)
  • मार्च 2013 2080 861
  • मार्च 2014 2108 882
  • मार्च 2015 1221 1004
  • मार्च 2016 2240 2055
  • मार्च 2017 1677 1695
  • मार्च 2018 1948 1453
  • मार्च 2019 1267 1477
  • मार्च 2020 1275 776 (डिसेंबर अखेर)

सिंचन घोटाळ्यावर चुप्पी

सिंचन घोटाळ्याप्रकरणी नव्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याविषयी विचारले असता मंडळाच्या बैठकीत झालेल्या विषयांवर सांगतो असे म्हणून संचेती यांनी बोलण्याचे टाळले.

बुलडाणा येथे वैद्यकीय महाविद्यालय?

बुलडाणा जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. यासाठी 2018 मध्ये सर्व्हेक्षण झाले. महाविद्यालयासाठी जिल्हा रुग्णालयास लागून असलेली 25 एकर जागा प्रस्तावित करण्यात आल्याचे संचेती यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Irrigation surplus 1.63 lakh hectares in western Vidarbha