
जल जीवन मिशनअंतर्गत सन २०२० ते २०२४ पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. या नवीन योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमानसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे.
नागपूर : जल जीवन मिशनला यशस्वी करताना सर्वप्रथम तहानलेल्या गावांसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा उपाययोजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात वर्ष २०२०-२१ साठी ९१,६०४ नळ कनेक्शनचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, आतापर्यंत जिल्ह्यात ९२.२९ टक्के काम पूर्णही झाले आहे. ‘हर घर नल से जल’ या उपक्रमांतर्गत २०२४ पर्यंत नळाद्वारे दरडोई ५५ लिटर पाणी देण्याचा संकल्प केला आहे.
जल जीवन मिशनअंतर्गत सन २०२० ते २०२४ पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. या नवीन योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमानसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. यापूर्वी अस्तित्वातील ४० लिटरप्रमाणे पाणी उपलब्ध असणाऱ्या जुन्या योजनादेखील आता ५५ लिटर प्रतिव्यक्ती प्रतिदिवस योजनेमध्ये परिवर्तित होणार आहेत.
योजना लागू होण्यापूर्वी जिल्ह्यातील ३ लाख ६५ हजार ४१९ लाभधारक कुटुंबांपैकी १ लाख ५४ हजार १९० कुटुंबाकडे वैयक्तिक नळ जोडणी होती. त्यामुळे २ लाख ११ हजार २२९ कुटुंबाला ही नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट होते. त्यातील मे महिन्यात २२, जूनला ५ हजार ७३९ , जुलैला १ हजार ७४०, ऑगस्टला ७ हजार ६८ , सप्टेंबरला ८ हजार २५१, ऑक्टोबरला १३ हजार २५७ , नोव्हेंबरला २९ हजार ७१६ , डिसेंबरला ७ हजार ९२७ तसेच खासगी स्त्रोतांना १७,११८ अशा ८४ हजार ५३८ खासगी, वैयक्तिक नळ जोडणी व त्यांच्या नोंदणीचे काम पूर्ण झाली आहे.
वैयक्तिक नळ जोडणीचे सर्वाधिक काम नागपूर ग्रामीण तालुक्यात १६७.८३ टक्के झाले आहे. पाठोपाठ मौदा तालुक्यात १६६.४२ टक्के झाले आहे. कामठी तालुक्यात १४२.०८ टक्के, पारशिवनीत ७४.६२, उमरेडमध्ये ७३.१४ टक्के, नरखेड तालुक्यात १००.३५ टक्के, काटोलमध्ये ९९.८३ टक्के, सावनेरात ९१.१५ टक्के , हिंगण्यात ७८.१४ टक्के, रामटेकमध्ये ७८ टक्के, तर कुही, भिवापूर व कळमेश्वर तालुक्यात पन्नास टक्क्यांहून कमी झाली.
संपादन : अतुल मांगे