दरोड्याच्या तयारीत होते आरोपी, पोलिसांना लागला सुगावा आणि...

गुरुवार, 25 जून 2020

काही आरोपी परिसरातील पिरॅमिड सिटीलगत रिकाम्या प्लॉटच्या पडक्‍या सुरक्षा भिंतीजवळ जमले आहेत. त्यांच्याजवळ तीक्ष्ण शस्त्रेही आहेत. ते कुठेतरी मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

नागपूर : दरोडा टाकण्याच्या तयारीत लपून बसलेल्या पाच जणांना जरीपटका पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. अटकेतील आरोपींमध्ये नारा रोड निवासी शुभम संजय गणवीर (23), मोठा इंदोरा निवासी शुभम राजेश भगत (24), भीमसेनानगर निवासी हर्ष सदानंद बोबर्डे (19), इंदोरानगर गल्ली क्र. 1 निवासी कमल रामदास काळे (24) आणि लुर्दू मातानगर निवासी अविनाश लक्ष्मण रागोसे (21) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री 1.15 ते 1.30 वाजतादरम्यान जरीपटका ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जाधव सहकाऱ्यांसह गुन्हेगारांचा शोध घेत परिसरात गस्त घालत होते. त्यांना माहिती मिळाली की, काही आरोपी परिसरातील पिरॅमिड सिटीलगत रिकाम्या प्लॉटच्या पडक्‍या सुरक्षा भिंतीजवळ जमले आहेत. त्यांच्याजवळ तीक्ष्ण शस्त्रेही आहेत. ते कुठेतरी मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत.

या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून तेथे धाड टाकली असता, वरील आरोपी दरोड्याच्या तयारीत असल्याचे आढळले. सर्व आरोपींना तत्काळ अटक करून त्यांची झडती घेण्यात आली. झडतीमध्ये आरोपींजवळून पेंचीस, पेचकस, कटर, भाल्यासारखा टोक असलेला रॉड, आरी, दोरी, टॉर्च, तिखट, चाकू, लोखंडी दांडा, काटेरी चाकू जप्त करण्यात आले. आरोपींवर दरोड्याची तयारी व आर्म्स ऍक्‍टअन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

दुचाकीच्या पार्किंगसाठी सतत घालत होती वाद; मग त्याने महिलेच्या छातीत...

बोनसचे आमिष दाखवून गंडविले

बोनसचे आमिष दाखवून ठगबाजाने एका व्यक्‍तीचे बॅंक तपशील घेऊन दोन लाख रुपये परस्पर काढून फसवणूक केली. ती रक्कम त्याने आपल्या खात्यात परस्पर वळती केली. प्रियरंजन यादव (रा. बिहार) असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनमोल नगर रिंग रोड येथे राहणारे लिखाराम (54) घरी असताना ठगबाज प्रियरंजन यादव नावाने 9971501218, 8375992381,9060517958 या तीन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून लिखाराम यांना फोन आला. ठगबाजाने त्यांना बोनसचे आमिष दाखविले. बोनस मिळणार या आमिषाने त्यांनी बॅंक खात्यासह विचारलेली सर्व माहिती आरोपीला सांगितली. काही वेळातच लिखाराम यांच्या खात्यातून तब्बल 2 लाख रुपये प्रियरंजन यादव नावाच्या खात्यात परस्पर वळते झाले.