इतवारीमार्गे हावडासाठी बुधवारी धावणार किसान रेल

योगेश बरवड
Monday, 23 November 2020

भारतीय रेल्वेने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देशभरात किसान रेल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीतून शेतीमाल देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात किफायतशीर दरात पोचवला जातो. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलू लागले आहे.

नागपूर  ः छिंदवाडा-हावडा किसान रेलला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता बुधवारी (ता. २५) नागपूरच्या इतवारी स्थानकमार्गे छिंदवाडा-हावडा किसान रेल्वेची दुसरी फेरी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे पाठविण्यात येणार आहे.

भारतीय रेल्वेने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देशभरात किसान रेल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीतून शेतीमाल देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात किफायतशीर दरात पोचवला जातो. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलू लागले आहे. कमी अवधीत सुरक्षितपणे माल पोहोचत असल्याने त्याचा दर्जाही टिकून राहतो. 

यामुळे शेतमालाला दरही चांगला मिळतो. दपूरमरेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर उप्पल व वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक विकास कुमार कश्यप यांच्या प्रयत्नांतून २८ ऑक्टोबर रोजी छिंदवाडा ते हावडादरम्यान पहिली किसान रेल्वे धावली होती. या फेरीला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पुढच्या टप्प्यात २५ नोव्हेंबरला दुसरी फेरी सोडण्यात येणार आहे. 

अधिक वाचा - चला मुलांनो, सोमवारपासून शाळेत या! ऑनलाईन बैठकीत घेतला निर्णय
 

पहाटे ५ वाजचा ही गाडी छिंदवाडा येथून रवाना होईल. सौंसर, सावनेरमार्गे ही गाडी इतवारी स्थानक गाठेल. पुढे गोंदिया, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, चांपा, रायगढ, झारसुगुडा, राउलकेला ,चक्रधरपूर व टाटानगरमार्गे हावडा स्थानक गाठेल. व्यापारी किंवा शेतकरी प्रत्येकच स्थानकावरून आपला माल चढवू किंवा उतरवू शकतील.

गाडीच्या भाड्यात ५० टक्के सवलत दिली जात आहे. त्यानुसार एक क्विंटल मालासाठी केवळ ३०० रुपयांचा खर्च येणार आहे. रस्ते मार्गाने लागणाऱ्या खर्चापेक्षा ही रक्कम फारच कमी आहे. बुधवारी धावणाऱ्या गाडीतून प्राधान्याने फळे, भाज्या, दूध तसेच नाशवंत खाद्यपदार्थ वाहून नेण्यासाठी आरक्षण सुरू करण्यात आले आहे.

नागपूरहून शालिमारसाठी किसान रेल्वे रवाना

मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातर्फे प्रत्येक शनिवार व मंगळवारी असे आठवड्यातून दोन दिवस शालिमारसाठी किसान रेल्वे चालविण्यात येणार आहे. वरुड व पांढुर्णा रेल्वे स्थानकावरून शालिमारसाठी धावणाऱ्या या गाडीची पहिला रॅंक नागपूरवरून सायंकाळी ६ वाजता रवाना करण्यात आली. ही किसान रेल्वे संगोला आणि नागपूरवरून शालिमारपर्यंत चालणार आहे. यात शेतकरी सांगोलावरून डाळिंब आणि नागपूरवरून संत्री पाठवण्यात आली. या गाडीत पांढुर्णावरून ६५.८ टन संत्रे आणि वरूडहून १००.८ टन संत्री पाठविण्यात आली. त्यातून रेल्वेला ५ लाख ६४ हजार १८४ रुपयांचे उत्पन्न मिळाले. 

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kisan train to Howrah via Nagpur will run on Wednesday