हिमतीची दाद... मणक्‍यात घुसला होता चाकू अन्‌ युवक होता मोबाईलमध्ये गुंग

सतीश घारड
शनिवार, 27 जून 2020

शुकवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास शानू हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून घरी जात होता. दरम्यान, खैलेश सलामे, नागमनी वाघमारे हे दोघे इतर मित्रांसह तिथे पोहोचले. त्यांनी शानूसोबत वाद उकरून काढला. खैलेश सलामे याने "तू नागमनीला मेरे साथ काम कर, खैलेश के साथ काम मत कर' असा का बोलला म्हणून जाब विचारला. यानंतर नागमनी वाघमारे याने शानूवर मागून वार करीत माणक्‍यात चाकू खुपसला. 

टेकाडी (जि. नागपूर) : जिल्हा नागपूर... तालुका पारशिवनी... कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी बत्तीस वर्षीय युवक पोहोचतो... सर्वजण त्याच्याकडेच पाहत असतात... कारण, त्याच्या मणक्‍यात चाकू खुपसलेला असतो... तो पूर्णपणे रक्‍तबंबाळ झालेला असतो... प्राथमिक उपचार होईपर्यंत युवक रक्तबंबाळ अवस्थेत मोबाईलमध्येच गुंग असतो... यामुळे प्रत्येकजण आश्‍चर्य व्यक्‍त करीत असतात. त्याच्या या हिमतीला दाद द्यावी की नाही, असा प्रश्‍न रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णांना पडतो... तर वाचा सविस्तर... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शानू उर्फ समीर समशेर सिद्दिकी (32, रा. धरमनगर, कन्हान) हा सेंट्रिंग बांधाचे काम करतो. समीर हा नागमनी वाघमारे याला नेहमीच मानसिक त्रास देत होता. वारंवार नागमनी याला "तू खैलेशसोबत काम का करतोस, माझ्या सोबत काम कर' असे म्हणायचा. यामुळे नागमनी वाघमारे, खैलेश सलामे आणि शानू असा वाद नेहमीच सुरू राहायचा.

हेही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...

शुकवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास शानू हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून घरी जात होता. दरम्यान, खैलेश सलामे, नागमनी वाघमारे हे दोघे इतर मित्रांसह तिथे पोहोचले. त्यांनी शानूसोबत वाद उकरून काढला. खैलेश सलामे याने "तू नागमनीला मेरे साथ काम कर, खैलेश के साथ काम मत कर' असा का बोलला म्हणून जाब विचारला. यानंतर नागमनी वाघमारे याने शानूवर मागून वार करीत माणक्‍यात चाकू खुपसला. 

यानंतर शानूला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या शानूला काही नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. कन्हान पोलिसांना सूचना मिळताच जखमी शानूला तात्काळ मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. जिथे डॉक्‍टरांनी शस्त्रक्रियेद्वारे शानूच्या मणक्‍यातील चाकू काढला. सध्या त्याची प्रकृती धोक्‍याबाहेर असून, उपचार सुरू आहे.

अधिक माहितीसाठी - नवविवाहितेचा सासूसोबत झाला वाद; 'तुमचे काम करून देतो' असे म्हणतं प्रीती दासने केली ही मागणी...

दोन आरोपी ताब्यात, तीन फरार

शानूने पोलिसांना पाच जणांनी आपल्यावर हल्ला केल्याचे सांगितले. पोलिसांनी घर बांधकामात लागणाऱ्या मजुरांवर हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्‍त केला आहे. मात्र, प्रकरण काही वेगळेच असल्याची चर्चा परिसरात आहे. आरोपी नागमनी वाघमारे, बिट्टू कुसरे यांचा पोलिसांनी शोध घेऊन ताब्यात घेतले. गुन्ह्यातील खैलेश सलामे, विशाल चिंचुलकर, रोहन खरे हे तीन आरोपी अद्यापही पसार आहेत. कन्हान पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास पीएसआई सुरजुसे यांच्या सुपूर्द केलेला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: knife attack on youth in Tekdi taluka of Nagpur district