VIDEO : 'लक्ष्मी' घडविणाऱ्यांच्या जीवनात अंधारच, कुंभार बांधव अजूनही ग्राहकाच्या प्रतीक्षेत

रवींद्र कुंभारे
Monday, 9 November 2020

प्रकाशाचा उत्सव अर्थात दीपावली. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दीपावलीनिमित्त दिवे प्रज्वलित करण्यासाठी लागणाऱ्या पणत्या आणि पूजेसाठी महालक्ष्मीची मूर्ती आकार घेऊ लागल्या आहेत. सोबतच पणत्या बनवून सुकविण्याची लगबग सुरू आहे.

गुमगाव (जि. नागपूर) : कोरोना विषाणूच्या संकटामुळे यावर्षी प्रत्येक सण, उत्सवावर मर्यादा आल्याने सहा-सात महिन्यात झालेले सगळे सण नुकसानच करून गेले. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाला मंडळांकडून मूर्तीची मागणी नव्हती. त्यासोबतच माठ विक्रीही झाली नाही. आर्थिक संकटातील कुंभार बांधवांची सारी मदार आता दिवाळी सणावर आहे. परंतु, पारंपरिक कुंभार व्यवसायामध्ये आता व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात 'एन्ट्री' केल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कुंभार बांधवांची दीपावलीसुद्धा काळोखातच जाण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - 

घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

प्रकाशाचा उत्सव अर्थात दीपावली. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दीपावलीनिमित्त दिवे प्रज्वलित करण्यासाठी लागणाऱ्या पणत्या आणि पूजेसाठी महालक्ष्मीची मूर्ती आकार घेऊ लागल्या आहेत. सोबतच पणत्या बनवून सुकविण्याची लगबग सुरू आहे. या कामात कारागिरांचे संपूर्ण कुटुंब मग्न असल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे. मात्र, यावेळी लॉकडाउन, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि आता दीपावलीमध्ये व्यापाऱ्यांच्या 'एंट्री'ने इतर सण, उत्सवाप्रमाणे दिवाळीला आर्थिक फटका बसणार तर नाही ना, या विचाराने परिसरातील पारंपरिक व्यावसायिक चिंतातुर झाले आहेत. असे असूनही पारंपरिक व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी दिवाळीच्या सणाला दिव्यांमुळे तरी नशीब उजळेल या आशेने दिवे, पणत्या, लक्ष्मीची मूर्ती तयार करण्यात येत असल्याचे गुमगाव येथील प्रकाश ठाकरे, गणेश चिकाने, संदीप वालदे, सुरज ठाकरे, प्रवीण ठाकरे सांगतात. 

हेही वाचा - पहिल्याच प्रयत्नात नगरसेवक ते आता पदवीधर मतदारसंघ; वाचा संदीप जोशींचा राजकीय प्रवास

पारंपरिक व्यवसायात व्यापाऱ्यांची 'एन्ट्री' - 
कुंभार समाज पिढ्यानपिढ्या वर्षभर मेहनत करून मूर्ती, पणत्या, मडके घडवून आपली उपजीविका भागवतात. परंतु, या व्यवसायामध्ये सुद्धा व्यापाऱ्यांनी 'एन्ट्री' केल्याने कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला धोका निर्माण झाला आहे. व्यापारी मोठ्या प्रमाणात महालक्ष्मी मूर्ती, पणत्या, मडके ठोक भावात विकत घेतात आणि परिसरातील कुंभार बांधवांच्या तुलनेत बेभाव विकतात. लॉकडाउन आणि कोरोनाच्या प्रादूर्भावाने कुंभार बांधव आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. ऐन दीपावलीमध्ये व्यवसायात झालेल्या व्यापाऱ्यांच्या प्रवेशाने 'लक्ष्मी' घडविणाऱ्या कुंभार बांधवांच्या नशिबात यंदाही 'अंधारच' असल्याचे दिसून येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kumbhar community facing financial problems due to corona in gumgaon of nagpur