कोटेगाववासींचे जगणे अधांतरी, पुराने ९० टक्के नुकसान, मदतीचे घोडे मात्र अडले कुठे?

संदीप गौरखेडे
Tuesday, 10 November 2020

पूर आला नी गेला. पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याला दोन महिन्याचा कालावधी होतो. पुरपीडितांना मदत आज मिळेल उद्या मिळेल, याच प्रतीक्षेत ते आजही आहेत. गावात माणूसभर इतके पाणी साचलेले होते. ११९ घरात पुराचे पाणी शिरले होते. २५ घरे भुईसपाट झाली. २५ घरे पडण्याच्या स्थितीत आहेत. आजही घरातील ओलावा कायम आहे.

कोदामेंढी (जि.नागपूर) :ऑगस्ट महिन्यात झालेल्या महापुराचा फटका कोटगाववासींना चांगलाच बसला. ९४३ लोकवस्तीचे गाव. अगदी कन्हान नदीच्या तीरावर वसलेले. गावापासून चाळीस किलोमीटर अंतरावर गोसेखुर्द प्रकल्प. गोसेखुर्द धरणातील आणि वैनगंगा नदीतील ‘बॅक वाटर’ म्हणजेच थोप, या भागात आहे. गावाच्या दक्षिणेला डोंगर आहेत. त्यामुळे पुराचे पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने सरळ गावात शिरते. पुराचा फटका नदी किनाऱ्यालगत गाव असल्याने बसणारच. पूर येतच राहणार, त्याचा फटका नदी किनाऱ्यालगत गावांना आणि शेतीला होणारच. याकरिता आमच्या गावाचे पुनर्वसन गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत करावे, अशी मागणी कोटगाववासींची आहे.  

अधिक वाचाः अठरा गावांना पुराचा फटका, कालावधी दोन महिने, आता बोला ! मदतीचे काय?
      
पुनर्वसनासाठी लढत
पूर आला नी गेला. पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याला दोन महिन्याचा कालावधी होतो. पुरपीडितांना मदत आज मिळेल उद्या मिळेल, याच प्रतीक्षेत ते आजही आहेत. गावात माणूसभर इतके पाणी साचलेले होते. ११९ घरात पुराचे पाणी शिरले होते. २५ घरे भुईसपाट झाली. २५ घरे पडण्याच्या स्थितीत आहेत. आजही घरातील ओलावा कायम आहे. घरातील अत्यावश्यक वस्तू आणि धान्य पार पुरात वाहून गेलेत. शेतपिकाचे नव्वद टक्के नुकसान झाले. पुराचा लोंढा इतका होता की शेतजमीन खरवडून गेली. उभे पीक जमीनदोस्त आणि वाहून गेले. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले. पांदण रस्ते तर दिसेनासे झाले. शेतात वाळूचा खच साचलेला. सर्व काही पुरात वाहून गेले. १९९४ साली देखील पूर आला होता, मात्र इतके नुकसान झाले नसल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त करीत पुनर्वसनासाठी लढत असल्याचे सांगितले.

अधिक वाचाः मार्ग सुचेना ! धुळीत हरवले रस्ते...
 

प्रकल्पाने जमीन संपादन केल्यामुळे बरेच लोक भूमिहीन
कोटगाव कन्हान नदीच्या काठावर असून गावात खोलगट व टेकळ असे दोन भाग आहेत. खोलगट भाग नागनदीच्या लहान मोठ्या पुरात वारंवार बुडत असून घरांची नेहमी पडझड होते. या भागात मागासवर्गीय, आदिवासी, शेतमजूर व अल्पभूधारक शेतकरी राहतात. गोसे प्रकल्पाने जमीन संपादन केल्यामुळे या भागातील बरेच लोकं भूमिहीन झाले आहेत. हा भाग प्रकल्पाच्या बॅकवॉटर पार्श्‍वजलामुळे बाधित होते. असे गोसेखुर्द प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता यांनी २८ मार्च २०१४ च्या पत्रात लिहिले आहे. त्यामुळे खोलगट भागाचे गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत पुनर्वसन करावे अशी आमची शासनाला मागणी आहे.
-चंद्रविलास रंगारी
ग्रा. पं. सदस्य कोटगाव

दखल घेणे गरजेचे
गावाचे गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत पुनर्वसन व्हावे. शासनाकडे वारंवार मागणी करून हताश झालो. पुढील काळात पूर आल्यास गावाचे मोवाड होण्यास वेळ लागणार नाही. याकरिता शासनाने वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.
-संतोष टंडन
सामाजिक कार्यकर्ते

संपादनःविजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The life of the people of Kotegaon is in jeopardy, 90 per cent damage due to floods, but where are the help horses?