डॉ. यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार जाहीर

Tuesday, 29 December 2020

यावर्षी या पुरस्कारासाठी विदर्भ साहित्य संघाने डॉ. यशवंत मनोहर यांची निवड केली. डॉ. यशवंत मनोहर जन्माने काटोल तालुक्यातील येरला गावातील असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते.

नागपूर : विदर्भ साहित्य संघाचा सन्मानाचा समजला जाणारा जीवनव्रती पुरस्कार यावर्षी सुप्रसिद्ध कवी आणि आंबेडकरवादी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला. ज्यांनी आयुष्यभर साहित्याची सेवा करून मराठी साहित्यविश्वात आपली स्वतंत्र मुद्रा उमटविली अशा विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिकाला विदर्भ साहित्य संघातर्फे दर दोन वर्षांनी कै. ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या नावाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 

रोख पंचवीस हजार रुपये आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावर्षी या पुरस्कारासाठी विदर्भ साहित्य संघाने डॉ. यशवंत मनोहर यांची निवड केली. डॉ. यशवंत मनोहर जन्माने काटोल तालुक्यातील येरला गावातील असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. त्याआधी त्यांनी मराठवाड्यातील पैठण आणि नागपूर येथील वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्था (आधीचे मॉरिस कॉलेज) येथे अध्यापन केले. 

हेही वाचा - पीकविमा कंपनीच्या मॅनेजरला मारहाण करणे सेनेला भोवले, संपर्क प्रमुख संतोष ढवळेंविरोधात गुन्हा दाखल 
 

केशवसुत आणि मर्ढेकर यांच्या कवितांचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे आचार्य पदवी प्राप्त केली. मराठी साहित्यविश्वात डॉ. यशवंत मनोहर आंबेडकरी साहित्य प्रवाहातील पहिल्या पिढीचे महत्त्वाचे कवी आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात. १९७८ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘उत्थानगुंफा’ कवितासंग्रहाने मराठी काव्यप्रांतातील एक महत्त्वाचे म्हणून कवी त्यांना लौकिक प्राप्त झाला. 

केवळ आंबेडकरी कवितेतच नव्हे तर मराठी काव्यक्षेत्रात या कवितेने आपली वेगळी शैली आणि अभिव्यक्ती प्रदान करीत मराठीत नव्याने लिहू लागलेल्या आंबेडकरी कवींना वेगळी दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. पु. ल. देशपांडे, नरहर कुरुंदकरांपासून अनेक महनीयांनी या कवितेची पाठराखण केली. उत्थानगुंफासोबतच त्यांचे युगांतर, मूर्तिभंजन, प्रतीक्षायन, जीवनायन, स्वप्नसंहिता यांसारखे सुमारे तेरा कवितासंग्रह आणि कादंबरी, ललितनिबंध, समीक्षा, वैचारिक संपादन अशी विविध स्वरूपातील सुमारे पंचाहत्तरच्या वर पुस्तके प्रकाशित आहेत.

त्यांच्या काही पुस्तकांचा भारतीय कन्नड, हिंदी, गुजराती, इंग्रजी इत्यादी भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे. त्याशिवाय त्यांच्या साहित्याची चर्चा करणारी, त्यांची साक्षेपी समीक्षा करणारी किमान दहा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. सदतीस विविधप्रवाही साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

जाणून घ्या - घुग्घुसवासियांचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार, पालिकेसाठी सर्वपक्षीय चक्काजाम 
 

त्यांच्या लेखनासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वाङ् मय पुरस्कारासोबतच महाराष्ट्र फाउंडेशन, सहकारमहर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मारवाडी फाउंडेशन पुरस्कार, कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, नारायण सुर्वे पुरस्कार, सुगावा पुरस्कार इत्यादी सुमारे सत्तावीस पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सूर्यकुळाशी नाते सांगणारी कविता म्हणून यशवंत मनोहर यांच्या कवितेचा गौरव केला जातो. त्यांच्या एकूण समृध्द वाङ् मय प्रवासाचा आणि मराठी साहित्यविश्वाला दिलेल्या योगदानाचा विचार करून विदर्भ साहित्य संघाने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्याचे जाहीर केले आहे.

विदर्भ साहित्य संघातर्फे दिला जाणारा कै. माडखोलकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी कविवर्य ग्रेस, महेश एलकुंचवार, म. म. देशपांडे, सुरेश भट, मारुती चितमपल्ली, प्राचार्य राम शेवाळकर, वसंत आबाजी डहाके, आशा बगे आणि डॉ. वि. स. जोग या मान्यवरांना प्रदान करण्यात आला आहे. दिनांक १४ जानेवारी रोजी आयोजित होणाऱ्या विदर्भ साहित्य संघाच्या ९८ व्या वर्धापनदिनी डॉ. यशवंत मनोहर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे विदर्भ साहित्य संघाने कळविले आहे.

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lifetime Achievement Award of Vidarbha Sahitya Sangh to Dr. Yashwant Manohar