अरे बाबा... दारू जीवनावश्‍यक नाही, या जिल्ह्यात घडले असे...

liquor sales in lockdown at Wardha district
liquor sales in lockdown at Wardha district

नागपूर : कोरोना विरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. प्रशासनातर्फे दररोज विनंती, सूचना, आदेश देऊनही नागरिकांनी रस्त्यावर येणे थांबलेले नाहीत. यातील बव्हंशी लोक दारू, खर्रा याच्या शोधात निघत असल्याचे सांगण्यात येते. परवा वर्धा जिल्ह्यातील वणी येथे एक वाईन बार मालक बार उघडून दारूविक्री करताना आढळला. त्या बारवर कारवाई करण्यात आली. परंतु, बारमालकावर मात्र कारवाई झाली नसल्याची माहिती आहे. एकाने दुकान उघडताच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आपत्ती निवारण कायद्यान्वये कठोर कारवाई केली असती तर इतरांवर चाप बसला असता. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. लपून छपून मिळणारी दारू एकदा का बंद झाली की त्यासाठी बाहेर निघणारे घरातच राहतील आणि तेव्हाच कुठे महाराष्ट्र लॉकडाऊन होईल. 

जगभर जीवनमरणाची लढाई सुरू असताना चार पैशांसाठी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्‍यात घालण्याची हिंमत होतेच कशी, हा खरा प्रश्‍न आहे. वणीतील प्रकरणात प्रशासनाने कारवाई केली नसल्याने छुप्या मार्गांनी लोकांना दारू उपलब्ध होत आहे आणि ती मिळविण्यासाठी तळीराम घराबाहेर पडून गर्दी करीत असल्याचे बंदोबस्तावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले. 

हेच चित्र थोड्याफार फरकाने राज्यभर आहे. लोकांना आताच हे कळायला पाहिजे की, जीव राहिला तर सर्व काही करता येईल. त्यामुळे आता लोकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे झाले आहे. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांमुळे बंदोबस्तावरील पोलिसांचा ताण वाढतो आहे. शहर आणि गावांमध्ये टारगट मुले एकत्र येत रस्त्यांवर फिरतात. पोलिसांची गाडी आली की पळून जातात. हे चित्र थोड्याफार फरकाने राज्यभर आहेत. म्हणजे यांना अजूनही कोरोनाचे गांभीर्य कळलेले दिसत नाही. 

जीवनावश्‍यक वस्तूंची, औषधांची कमतरता अजिबात नाही, ही दुकानेही बंद नाहीत, असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. तरीही लोक घराबाहेर पडताहेत. पोलिसांशी हुज्जत घालताहेत. कोरोनासोबतच्या लढाईच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर असतानाही लोक ऐकत नसतील, तर कठोर पावले उचलण्याच्या मनस्थितीत प्रशासन आले आहे. पण, लोकांनी असे करण्यास भाग पाडू नये, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

खोटी कारणे सांगून रस्त्यांवर फिरू नका

राज्यभरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन होत नसल्याने प्रशासकीय यंत्रणा करीत असलेल्या प्रयत्नांना यश येत नाही. आता यापुढे नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन केले नाही तर भविष्यात भीषण स्थितीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे खोटी कारणे सांगून रस्त्यांवर फिरून प्रशासनाला विनाकारण त्रास देणाऱ्या लोकांनी आता स्वयंशिस्त पाळण्याची वेळ आली आहे. नाही तर हा विषाणू समाजात मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्‍यता कुणीही नाकारू शकत नाही. चोरून, लपून दारू विकणारे आणि खरेदी करणाऱ्यांवर पायबंद घातल्याशिवाय "लॉकडाऊन' पूर्णपणे होणार नाही, हे ही तितकेच खरे. 

दुप्पट आणि तिप्पट किंमतीत दारू विक्री

थोड्याशा पैशांसाठी लाकडाऊनमध्येही दारूविक्री करणाऱ्यांना स्वतःच्या जिवाची परवा नसेल, पण समाजाच्या स्वास्थासाठी तरी असे प्रकार घडू नये म्हणून चोरून विक्री करणाऱ्यांना कठोर शासन करण्याची गरज आहे. अशा काही लोकांमुळेच सध्या दारूचा काळाबाजार गरम झाला असल्याचे सुत्रांनी सांगितले. दुप्पट आणि तिप्पट किंमतीत दारू विकली जात आहे आणि शौकीन तीखरेदी करीत आहेत.

दारू घेणाऱ्यांवरही कारवाई करण्याची गरज

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असताना दारू प्याल्याने रोगप्रतिकार शक्ती कमी होते, असे डॉक्‍टर्स वारंवार सांगत असतानाही लोक जर स्वतःवर आवर घालू शकत नसतील, तर अशा लोकांना कठोर शासन करणे हाच एकमेव उपाय आहे. विकणाऱ्यांइतकेच खरेदी करणारेही दोषी आहेत. त्यामुळे प्रशासनाने माहिती घेऊन लॉकडाऊनमध्ये दारू विकणारे आणि खरेदी करणारे दोहोंवरही कठोर कारवाई करण्याची गरज आहे. तेव्हाच कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी होतोय, असे म्हणता येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com