मेट्रो स्टेशनवर ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र; वॉकिंग ट्रॅक आणि वाचनालयाची सुविधा

राजेश प्रायकर 
Wednesday, 28 October 2020

वर्धा मार्गावरील एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरील विरंगुळा केंद्रातील वाचनालयात महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूचे दर्शन घडविणाऱ्या अनेक पुस्तकाचा समावेश आहे

नागपूर ः महामेट्रोने एअरपोर्ट स्टेशनवर बापू कुटीची प्रतिकृती तयार केली. आता याच स्टेशनवर ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तयार केले. २८ ऑक्टोबरपासून विरंगुळा केंद्र ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले होणार आहे. येथे वॉकिंग ट्रॅकसह वाचनालयही तयार करण्यात आले आहे.

हेही वाचा - कठोर मुलीला बाप नको होता; पण, चार लाख मिळविण्यासाठी हवे मृत्यूप्रमाणपत्र

वर्धा मार्गावरील एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरील विरंगुळा केंद्रातील वाचनालयात महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूचे दर्शन घडविणाऱ्या अनेक पुस्तकाचा समावेश आहे. याशिवाय शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, विनोबा भावे यांच्या जीवनावरील तसेच इतर साहित्यिक पुस्तके देखील नागरिकांकरिता उपलब्ध असणार आहे. मेट्रोने शहरात सुरू केलेले अशा प्रकारचे हे पहिले विरंगुळा केंद्र आहे. 

या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक पुस्तकांचा आनंद घेऊ शकतील. या वाचनालयात प्रवेश निशुःल्क आहे. मेट्रो रेल प्रकल्पाशी जास्तीत जास्ती नागरिकांना जोडणे व मेट्रो सेवेचा नागरिकांनी वापर करावा, यासाठी असे उपक्रम सुरू करण्यात येत असल्याचे महामेट्रोने नमुद केले. 

शहरातील विविध भागात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी सुलभ, सुखकर, सुरक्षित, सॅनिटाईज मेट्रोने प्रवास करून या विरंगुळा केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामेट्रोने केले आहे. 

नक्की वाचा - शेपूट नसलेला श्वान बघितला ना? कधी प्रश्न पडला, का कापली असावी शेपूट? हे आहे कारण

शहरातील इतर ज्येष्ठ नागरिक मंडळाने देखील या स्टेशन परिसरातील विरंगुळा केंद्राचा लाभ घ्यावा तसेच मेट्रो भवन येथील तळमजल्यावर व्हिजिटर्स आणि विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेल्या विविध उपक्रमांना, प्रदर्शनीला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahametro will provide good facilities for senior citizens