लॉकडाऊनमध्ये विस्कटली मोलकरणींच्या संसाराची घडी, दोन वेळची चूल पेटणे कठीण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जून 2020

घरात असलेला पैसा अडका आणि धान्यही संपत आले आहे. किराणा दुकानदारांनी अधिक उधारी देण्यास नकार दिला आहे. लॉकडाउनचा काळ पुढेही वाढणार असल्याचे दिसते. त्यामुळे आता जगायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागपूर : कोणत्याही आपत्तीच्या वेळी गरीब कुटुंबांना सर्वाधिक झळ सोसावी लागते. कोरोना महामारीच्या दुष्टचक्राने हीच अवस्था घरकाम करणाऱ्या मोलकरणींची झाली आहे. दोन ते अडीच महिन्यांपासून काम बंद झाले आहे, मार्च महिन्याचा पगारही रखडला आहे. घरचे पुरुषही मोलमजूरी करणारेच. त्यामुळे मोलकरणींच्या कुटुंबाला अतिशय हलाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. जाटतरोडीमध्ये राहणाऱ्या सीमा घुडधे आणि मालाबाई वनवे यांची व्यथा ही तमाम मोलकरणींच्या विदारकतेचे चित्र उभी करणारीच आहे.

जाटतरोडी मध्ये राहणाऱ्या सीमा यांच्या घरी पती व तीन मुलांचा संसार. त्यांचे पती कॉटन मार्केट परिसरात ठेला लावून फळ विक्रीचे काम करतात. त्यांचे कामही दीड-दोन महिन्यांपासून बंद आहे. मार्केटमध्ये फळ विक्रीसाठी जाताही येत नाही. सीमा या दोन तीन घरी जाऊन धुणी भांड्याचे काम करतात. त्यातून चार-साडे चार हजार पगार मिळतो. सुट्या झाल्या तर पैसा कापला जातो. मार्चपासून त्यांचेही काम बंद झाले आहे. शिवाय मार्च महिन्याचा पगारही यात रखडला. घरमालकांनीही तो देण्याची तसदी घेतली नाही. घरात असलेला पैसा अडका आणि धान्यही संपत आले आहे. किराणा दुकानदारांनी अधिक उधारी देण्यास नकार दिला आहे. लॉकडाउनचा काळ पुढेही वाढणार असल्याचे दिसते. त्यामुळे आता जगायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या मालाबाई वनवे यांची परिस्थिती काही वेगळी नाही. पती रिक्षा चालक. काही वर्षापूर्वी लकवा मारलेला. आजही त्यांचा एक हात काम करीत नाही. या अवस्थेत सकाळी रिक्षा घेउन जातात पण सवारी मिळत नसल्याने निराश परतावे लागते. घरी लकव्याने पडलेली म्हातारी सासू व दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे कामही लॉकडाउनमध्ये बंद पडले. मालाबाई यांचे काम मार्चपासून बंद झाले. त्या महिन्याचा पगारही मिळाला नाही. या काळात होते नव्हते ते सर्व संपले आहे. पैसा नाही आणि धान्यही नाही. काही दिवस उधार करून घर चालविले पण आता तेही मिळणे थांबले. आता जगायचे कसे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मालाबाई यांचे कुटुंब हताश आणि निराश मनस्थितीत जगत आहे. सीमा आणि मालाबाईंची कथा हजारो मोलकरणींच्या कथेचे प्रतिनिधित्व करणारी आहे. कोरोना उद्रेकाने त्यांचे जगणेच उध्वस्त केले आहे. या अवस्थेत त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे.

दोन वेळचे पोट भरणे कठीण
आम्ही चार घरची भांडी घासू तेव्हा आमच्या घरची चूल पेटते. गरीबीमुळे आधिच हलाखीचे जीवन जगत असतांना लॉकडाऊनच्या काळात अजूनच हाल होत आहेत. सरकारने कितीही सांगितले असले तरी, ना आम्हाला पगार मिळाला आणि ना मोफत धान्य. काही सामाजिक संस्थांनी काही दिवस अन्न, धान्याचे पॅकेट दिले त्यावर गुजराण केली. पण आता तीही मदत बंद झाल्याने, दोन वेळचे पोट भरणे कठीण झाले आहे.
कांता घोरमाडे, सदस्य, घरकाम महिला संघटना, नागपूर.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The maid has no salary in lockdown