कशा ठरणार "आशा' ग्रामीण भागाचा कणा?, वाचा काय झाला गैरप्रकार

बुधवार, 3 जून 2020

नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे एकात्मिक आरोग्य व कुटुंबकल्याण सोसायटी स्थापन करण्यात आली. 2019 मध्ये या प्रशिक्षणासाठी 2 लाख 37 हजार 664 रुपये अनुदान मिळाले.

नागपूर : ग्रामीण भागाच्या आरोग्याचा कणा ठरलेल्या आशांच्या सेवेचे मोल लक्षात घेत "आशां'ना आरोग्यविषयक सक्षम बनवण्यासाठी शासनामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत विश्‍वास अभियान प्रशिक्षण दिले जाते. मात्र, प्रशिक्षण न घेता उमरेड येथील तालुका आरोग्य अधिकारी यांनी खोटी बिले सादर करीत प्रशिक्षण वर्ग घेतले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. यामुळे प्रशिक्षणासाठी मिळालेल्या निधीमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय आहे.

उमरेड तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, बेला, मकरधोकडा, सिर्सी, पाचगावअंर्तगत येणाऱ्या आशा स्वयंसेविका, सरपंच, आरोग्यसेविका तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम असतो. यासाठी नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे एकात्मिक आरोग्य व कुटुंबकल्याण सोसायटी स्थापन करण्यात आली. 2019 मध्ये या प्रशिक्षणासाठी 2 लाख 37 हजार 664 रुपये अनुदान मिळाले.

निधी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप जनार्दन धरमठोक यांच्या अधिकारक्षेत्रात वळता करण्यात आला. एका बॅचमध्ये 30 जण अशाप्रकारे 10 बॅचमध्ये 28 फेब्रुवारी 2019 पूर्वी हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात यावा, अशी सूचना होती.

नेमून दिलेल्या काळात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकारी यांची असते. परंतु, या कालावधीत डॉ. धरमठोक यांनी पाचगाव सिर्सी येथे 22 फेब्रुवारी 2019 आणि मकरधोकडा व बेला येथे एकच दिवस प्रशिक्षण घेतल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, उर्वरित 8 दिवस प्रशिक्षण न घेता 6 मार्च ते 16 मार्च 2019 या कालावधीत 10 बॅचेसचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले.

आरोग्य अधिकारी यांनी मार्चमधील तारखांकडे दुर्लक्ष केले. या कालावधीत आशा, अंगणवाडी सेविका या पल्स पोलिओच्या घरोघरी जाऊन डोस देण्याच्या कार्यात होत्या. यामुळे या काळात प्रशिक्षण कसे राबवले, हा खरा प्रश्‍न आहे. ही संपूर्ण माहिती सामाजिक कार्यकर्ते गोपी भगत यांनी माहिती अधिकारात मिळवली आहे. यासंदर्भात आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.

दुसरा हप्ता शिल्लक प्रशिक्षणासाठी

पहिल्या विश्‍वास प्रशिक्षणासाठी 2 लाख 37 हजार 664 रुपयांचा निधी मिळाला होता. यानंतर शिल्लक राहिलेल्या आशा, अंगणवाडी सेविका आणि आरोग्यसेविका यांच्या विश्‍वास प्रशिक्षणासाठी 36 हजार रुपयांचा दुसरा हप्ता दोन टप्प्यात प्रत्येकी 18 हजार रुपये या प्रमाणे आला होता. हे प्रशिक्षण केव्हा घेतले, यासंदर्भात माहिती मागवली असता, त्यांना ही माहिती देता आली नाही.

खोटी बिले सादर....?

या प्रशिक्षण कालावधीत बिले सादर करताना "मधुर मिलन' या कॅटरिंग चालकाची पावती आहे. विशेष असे की, मधुर मिलन हे डिजे, साऊंड, डेकोरेशन, जनरेटर, व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफी, नळ व इलेक्‍ट्रिक फिटिंगची कामे करणारे आहे, त्यातच कॅटरिंग असा एक व्यवसाय अंतर्भूत आहे. ही बिले एखाद्या कर्मचाऱ्यानेच लिहिलेली असावीत, या शंकेला वाव आहे. या बिलांवर जीएसटी लावण्यात आला नाही. या प्रकरणाची तक्रार इंटक कामगार संघटनेतर्फे करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

ट्रेनिंग ऑफ ट्रेनर : इंटकची मागणी

हे प्रशिक्षण "ट्रेनिंग ऑफ ट्रेनर'कडून राबवण्यात आले नसल्याचा दावा इंटकतर्फे करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी राबवलेल्या विश्‍वास प्रशिक्षणातील गैरव्यवहाराची तक्रार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे करणार असल्याचेही इंटकतर्फे कळविण्यात आले.