VIDEO :  कौतुकास्पद! घरीच सुरू केले ज्ञान मंदिर; स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उघडलं वाचनालय 

सतीश तुळसकर
Thursday, 31 December 2020

गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या घरात सुरू असलेल्या वाचनालयात शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तसेच स्पर्धा परीक्षा देणारे तरुण तरुणी अभ्यास करतात. 

उमरेड (जि. नागपूर) : ‘सब के लिये खुला है मंदिर यह हमारा’ या राष्ट्रसंतांच्या ओळींना सार्थ ठरवत नूतन आदर्श महाविद्यालयातील सेवानिवृत्त माजी ग्रंथपाल बंडू शिंदे यांनी नगर परिषद कार्यालयाजवळ असलेल्या त्यांच्या राहत्या घरीच सार्वजनिक वाचनालय सुरू केले आहे. त्या वाचनालयाचे नाव ‘अनुभव वाचनालय’ असे आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या घरात सुरू असलेल्या वाचनालयात शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तसेच स्पर्धा परीक्षा देणारे तरुण तरुणी अभ्यास करतात. अनुभव वाचनालयात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ८७ विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन वेगवेगळ्या खात्यात विविध पदांवर कार्यरत असल्याचे ते सांगतात.

शीतल आमटेंच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आला समोर

७० वर्षांचे बंडू शिंदे अविवाहित आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी शिकवणी लावणे अवघड असल्यामुळे त्यांनी हे वाचनालय सुरू केले. ते अभ्यासकांकडून एकही रुपया मोबदला घेत नाहीत, शिवाय त्यांना मिळणाऱ्या पेन्शनचा वापर वाचनालयाच्या साहित्य खरेदीसाठी करतात. या वाचनालयाला कधी कुलूप लावले जात नाही. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा सर्व वाचनालये बंद होती, तेव्हा अनुभव वाचनालय विद्यार्थ्यांसाठी खुले होते, असे शिंदे म्हणाले.

 

 

Look Back 2020: वर्षभरात तब्बल ९० हत्याकांडांनी हादरली...

शिंदेंच्या उपक्रमाची दखल घेत अनेक अधिकाऱ्यांनी पुस्तके खरेदीसाठी दान दिल्याचे अनुभव वाचनालयाचे संचालकांनी सांगितले. शिंदे व त्यांचे मित्र व्यसनमुक्तीसाठी तालुका स्तरावर मोहीम राबवितात ते नेत्रदान करण्यासही नागरिकांना प्रोत्साहित करीत असतात. दररोज १०० च्या आसपास विद्यार्थी त्यांच्या वाचनालयात नियमित अभ्यासाला येतात. विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे, असे शिंदे म्हणाले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man started free study center for youth in Nagpur district