महापौर ते पोलिस निरीक्षक सर्वांकडून कोरोना मार्गदर्शक नियमांची पायमल्ली, गर्दीत मास्कचा विसर

राजेश प्रायकर
Saturday, 20 February 2021

राज्य सरकारने शिवजयंतीचा कार्यक्रम साधेपणाने कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक नियमांचा वापर करीत साजरा करण्याचे आवाहन केले होते. राज्य सरकारच्या आवाहनाचा निषेध करण्यासाठीच मास्कशिवाय व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवीत नागरिक एकत्र आल्याचे दिसून आले.

नागपूर : शहरात सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी केली. मात्र, यात सर्वच पक्षांचे नेते तसेच सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोनासंदर्भात जारी करण्यात आलेले मार्गदर्शक नियम पायदळी तुडविले. विशेष म्हणजे शहराचे प्रथम नागरिक महापौर दयाशंकर तिवारी यांचे मास्कही शिवाजीनगर तसेच महाल येथील कार्यक्रमात तोंडावरून गळ्यापर्यंत आल्याचे दिसून आले. नागरिकांना मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन करणारेच मार्गदर्शक नियम पायदळी तुडवीत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. 

हेही वाचा - बापरे! मुख्याध्यापिकेसह १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, शाळा बंद

राज्य सरकारने शिवजयंतीचा कार्यक्रम साधेपणाने कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक नियमांचा वापर करीत साजरा करण्याचे आवाहन केले होते. राज्य सरकारच्या आवाहनाचा निषेध करण्यासाठीच मास्कशिवाय व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवीत नागरिक एकत्र आल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांत कोरोनाने डोके वर काढले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी. यांनीही नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्क वापरण्याचे आवाहन केले होते. विशेष म्हणजे महापौर दयाशंकर तिवारी यांनी १३ फेब्रुवारीला तातडीची बैठक घेऊन समारंभामध्ये जाणाऱ्या नागरिकांनी मास्क, सॅनिटायजरचा वापर करावा, असे आवाहन केले होते. मात्र, आज महापौरांनी त्यांच्याच आवाहनाला हरताळ फासल्याचे दिसून आले. महापालिकेत शिवाजी महाराज यांच्या फोटोला माल्यार्पण करताना महापौरांनी मास्क घातल्याचे दिसून आले. परंतु समारंभात मास्क हनुवटीच्या खाली आले होते. 

हेही वाचा - सावधान! आठ दिवसांत ४ हजार रुग्णांची वाढ, नव्याने साडेसातशे बाधित; मृत्यूही वाढले

पोलिस अधिकाऱ्यांकडून उल्लंघन - 
महाल गांधी गेटजवळ नागरिकांनी मास्कशिवाय उत्सव साजरा केला. यावेळी नागरिकांकडून मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घेण्याची जबाबदारी असलेले पोलिस निरीक्षक मास्कशिवाय गर्दीत फिरताना दिसले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mayor and other leader violate corona rules in shivjayanti program nagpur