महापौर केसरी विजेता करतोय आधुनिक शेती ! वाचा ही प्रेरणादायी कहाणी

photo
photo


नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्‌यापीठाच्या आंतरमहाविद्‌यालयीन स्पर्धेत मी लागोपाठ तीनवेळा सुवर्णपदक जिंकले. अखिल भारतीय आंतरविद्‌यापीठ कुस्ती स्पर्धेत विद्‌यापीठाचे प्रतिनिधित्व केले. महापौर केसरी विजेता ठरलो. शिवाय बॉलीवूड स्टार सलमान खानच्या हस्ते माझा सत्कारही झाला. कुस्ती माझे पहिले प्रेम असले तरी, मी एक शेतकरीसुद्‌धा आहे. कुस्तीचा शौक पूर्ण करतानाच मी सध्या आधुनिक शेतीही करीत आहे. ही प्रेरणादायी कहाणी आहे 39 वर्षीय राष्ट्रीय कुस्तीपटू नीलेश राऊतची. 


आतापर्यंतच्या प्रवासाबद्‌दल नीलेश म्हणतो, कुस्ती माझ्या रक्‍तातच आहे. माझे आजोबा पहेलवान होते. आणि आईचे वडीलही पहेलवानकी करायचे. असे असले तरी, माझ्या कुस्तीची कहाणी थोडी वेगळी आहे. साधारणपणे 1992-93 ची गोष्ट असेल. आमच्या काटोल रोड, फ्रेन्ड्‌स कॉलनीतील घरासमोर "मिलिट्री कॅम्प' होता. त्यात कुस्तीचा संघ होता. सरावानंतर तेथील पहेलवान आमच्या दुध डेअरीवर दुध विकत घेण्यासाठी यायचे. त्यांना कुस्ती लढताना पाहून मलाही या खेळाबद्‌दल आवड निर्माण झाली. आपणही पहेलवानकी करावी, असा मनात विचार आला आणि थेट सदर येथील रामाराव अमृते व्यायामशाळा गाठली. तिथे मनपा चपराशी राहिलेले वस्ताद श्रीराम पेंदाम यांच्या तालमीत मी कुस्तीचे प्राथमिक धडे घेतले. आणि अवघ्या तीन वर्षांच्या सरावानंतर 1995 मध्ये करिअरमधील पहिली कुस्ती लढलो. त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. 

सलग तीन वर्षे "चॅम्पियन' 


शालेय व महाविद्‌यालयीन स्पर्धा गाजविल्यानंतर 2003 ते 05 या काळात विद्‌यापीठाच्या आंतरमहाविद्‌यालयीन कुस्ती स्पर्धेत लागोपाठ तीनवेळा "चॅम्पियन' झालो. या कामगिरीच्या जोरावर रोहतक, कुरुक्षेत्र आणि मेरठ येथील अखिल भारतीय आंतरविद्‌यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी माझी निवड झाली. दुर्दैवाने त्या स्पर्धांमध्ये मला पदक जिंकता आले नाही. याशिवाय 2002 मध्ये महापौर केसरी किताब जिंकला. तसेच विदर्भ केसरी स्पर्धेतही उपविजेता राहिलो. इतरही अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. उल्लेखनीय म्हणजे, 2010 मध्ये झालेल्या दबंग कुस्ती स्पर्धेत विजेता ठरल्यानंतर सलमान खानच्या हस्ते माझा सत्कारदेखील करण्यात आला. दरम्यानच्या काळात (2011 मध्ये) राणी दुर्गावतीनगर येथील पीएमएस हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. तेव्हापासून विद्‌यार्थी व मानकापूर येथील स्टार रेसलिंग अकादमीत प्रशिक्षक म्हणून खेळाडूंना घडवतो आहे. 
 

नीलेशला शेतीचीही आवड 


मी मुळात खेळाडू असलो तरी, मला शेतीचीही मनापासून आवड आहे. आमची कळमेश्‍वर तालुक्‍यातील खैरी येथे 34 एकर वडिलोपार्जित ओलतीची शेती आहे. वडील आणि मोठा भाऊ शेती करतात. कुस्ती आणि शाळेच्या व्यापातून जेव्हा-केव्हा वेळ मिळतो, तेव्हा-तेव्हा मीसुद्‌धा शेतीची सर्व कामे करतो. आमच्याकडे एकूण नऊशे संत्र्याची व तिनशे मोसंबीची झाडे आहेत. शिवाय कापूस, सोयाबिन, तूर, चना, गहू व इतर पिके घेतो. एकूणच कुस्ती, नोकरी आणि शेतीमध्ये सध्या खुश आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com