धक्‍कादायक! मेडिकलने कोरोनाबाधिताला दाखवला मेयोचा रस्ता 

file photo
file photo

नागपूर : अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एक महिला कोरोनाबाधित आढळली. ही महिला किडनी विकारानेही ग्रस्त आहे. या महिलेस हिमोडायलिसिसची गरज. राज्यातील पहिले कोविड हॉस्पिटल मेडिकलमध्ये तयार झाले. यामुळे वैद्यकीय संचालकांच्या शिफारशीनुसार महिलेस मेडिकलमध्ये रेफर केले. मात्र, कोविड हॉस्पिटल उभारताना ही सोय करण्यात आली नाही. मेडिकलमध्येही कधीकाळी असलेली हिमोडायलिसिसची सुविधा अनेक वर्षांपासून बंद पडली आहे. यामुळे या महिलेस मेडिकलने परस्पर "मेयो'त रेफर करण्याचा अफलातून प्रकार केला. यामुळे राज्यात पहिले कोविड हॉस्पिटल उभारणाऱ्या मेडिकलचे पितळ उघडे पडले. 

किडनी विकाराने ग्रस्त असलेले शेकडो रुग्ण रोज मेडिकल आणि सुपर स्पेशालिटीच्या आश्रयाला येतात. शुक्रवारी (ता. 29) अकोला येथील मेडिकल कॉलेजमधून एका कोरोनाबाधित महिलेस मेडिकलमध्ये रेफर केले. या महिलेस कोरोनाची बाधा असल्याने खासगीत किंवा इतर दुसऱ्या रुग्णालयात रेफर करणे शक्‍य नव्हते. यामुळे हिमोडायलिसिससाठी मेडिकल हाच पर्याय योग्य असल्याने वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या सूचनेप्रमाणे मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले.

मेडिकलमध्ये तीन वर्षांपूर्वी हिमोडायलिसिसची सोय होती. परंतु, हळूहळू मेडिकलचे किडनी युनिटचे काम थंडबस्त्यात पडले. मेडिकलमधील हिमोडायलिसिसच्या रुग्णांना डायलिसिससाठी सुपरचा रस्ता दाखवला जातो. मात्र, अकोल्यातील या महिलेस कोविड असल्याने तिला सुपरमध्ये हलवण्यात आले नाही. या अडचणीमुळे मेडिकलमधील वरिष्ठांनी या कोरोनाबाधित महिलेस मेयोमध्ये रेफर केले. यासंदर्भात मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही. 

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या निर्देशाला खो 
सुपरमध्ये डॉ. श्रिगिरीवार यांच्या पुढाकारातून चार डायलिसिस यंत्रे मिळाली होती. दिवसाला बारा ते पंधरा डायलिसिस होत होते. परंतु, मेडिकलमध्ये औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या उदासीन धोरणामुळे हिमोडायलिसिस बंद पडले आहे. या विभागाचे विभागप्रमुख पुढाकार घेत नसल्याचे उघड झाले होते. तत्कालिन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी 27 सप्टेंबर 2016 रोजी घेतलेल्या बैठकीत मेडिकलच्या औषधशास्त्र विभागाअंतर्गत आयसीयूमध्ये हिमोडायलिसिस तसेच पोटातून होणारे डायलिसिस सेंटर सुरू करण्याचे निर्देश दिले होते. अडीच वर्षे लोटून गेली; परंतु अद्याप येथील सेंटर सुरू करण्यात आलेले नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com