esakal | काही आठवणी आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार डॉ. भाऊ लोखंडेंच्या
sakal

बोलून बातमी शोधा

bhau lokhande

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. भाऊ लोखंडे यांचे मंगळवारी (ता. २२) निधन झाले. त्यांच्या काही ह्रद्य आठवणी

काही आठवणी आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार डॉ. भाऊ लोखंडेंच्या

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, पाली साहित्याचे गाढे अभ्यासक तसेच नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. भाऊ लोखंडे यांचे मंगळवारी (ता. २२) निधन झाले. त्यांच्या काही ह्रद्य आठवणी

अयोध्या कोणाची, रामाची, बाबराची की बुद्धाची ?’ या विषयावरील संशोधन ग्रंथांतून अयोध्या ही पूर्वाश्रमीची साकेतनगरी होती असे संशोधन डॉ. भाऊ लोखंडे यांनी पुढे आणले होते. या ग्रंथाने एक नवा इतिहास पुढे आला. यावर प्रचंड चर्चा झाली. अयोध्येतील विनितकुमार मौर्य, आगरा येथील भदन्त आनंद, भदंत सत्यानंद यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. अयोध्येतील उत्खननात बौद्ध विहारांचे अवशेष सापडले होते. लखनऊ उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २००२ मध्ये पुरातत्व विभागाद्वारे उत्खनन सुरू झाले होते. १५० खड्डे खोदण्याचे निर्देश दिले होते. यातील ५० खड्डे खोदण्यात आल्यानंतर बहुतांश खड्ड्यांमध्ये बौद्ध विहारांचे अवशेष सापडले होते. सारनाथ आणि श्रावस्ती नगरीच्या बौद्ध अवशेषांशी साम्य असणारा अहवाल पुरातत्व विभागाने न्यायालयासमोर सादर केला. मात्र पुढे तेथील व्यवस्थेने खोदकामावर बंदी आणली होती. हा सर्व इतिहास पुराव्यांसहित ग्रंथातून सादर करण्यात आला आहे.

सर्वपक्षीयांनी साजरा केला होता डॉ. भाऊ लोखंडे यांचा अमृत महोत्सवी सत्कार
एक जुलै २०१७ चा दिवस. नागपूरचे वसंतराव देशपांडे सभागृह. रिपब्लिकन स्टुंडन्ट्स फेडरेशनचे प्रणेते, दलित साहित्य चळवळीत महत्वाचे योगदान असलेले ज्येष्ठ साहित्यिक , विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांनी १५ जून २०१७ रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण केलीत. त्यानिमित्त डॉ. भाऊ लोखंडे अमृत महोत्सवी नागरिक सत्कार समितीच्यावतीने त्यांचा १ जुलै रोजी अमृत महोत्सवी सत्कार आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय भूपृष्‍ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, तत्कलिन आमदार जोगेंद्र कवाडे, ज्येष्ठ साहित्यिक ताराचंद खांडेकर व प्रा. अशोक गोडघाटे उपस्थित होते. या समितीचे समन्वयक डॉ. गिरीश गांधी होते. तर समितीचे संयोजक डॉ. नितीन राऊत, कार्याध्यक्ष अटलबहादूरसिंग, सचिव बाळू घरडे होते.

पवार म्हणाले होते..भाऊ नवे सरकार येईल...
२०१९ सालची घटना. राज्यात निवडणूका झाल्या होत्या. परंतु भाजप सेनेची युती तुटल्याने राज्यात अस्थिर वातावरण निर्माण झाले होते. सरकार स्थापन होण्याचा थांगपत्ता नव्हता. नेमक्या याच वातावरणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आले होते. त्यावेळी काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेट पवार यांनी दिली. यावेळी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यासह ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक यशवंत मनोहर व ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉक्टर भाऊ लोखंडे उपस्थित होते. यावेळी पवार नावाच्या भीष्माचार्याने महाराष्ट्राचा इतिहास बदलून द्यावा अशा भावना डॉ. भाऊ लोखंडे यांनी पवारांसमोरच व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी पवार यांनी भाजपा सत्तेतून जाईल, नवे सरकार स्थापन होईल अशी ग्वाही दिली होती.

डॉ. लोखंडेंच्या उपस्थितीत सुरेश भट यांनी स्वीकारला होता बौद्ध धम्म
उष:काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा’ मशाली…’ असा आशावाद आपल्या काव्यातून मांडणाऱ्या सुरेश भटांनी मराठीत गझल प्रकार रुजवला. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. डॉ. भाऊ लोखंडे यांच्या उपस्थितीत भन्ते सुरई ससाई यांनी सुरेश भट यांना धम्मदीक्षा दिली होती. सुरेश भट यांनी यावेळी डॉ. भाऊ लोखंडे यांचा बौद्ध पंडित म्हणून उल्लेख केला होता. बौद्ध धर्म हा ईश्वराचे अस्तित्व नाकारणारा बाबासाहेबांनी शुद्ध स्वरूपात दिलेल्या धम्माची ओळख भाऊंच्यामुळे झाल्याची कबुली यावेळी त्यांनी दिली होती. या इतिहासाची उजळणी डॉ. भाऊ लोखंडे यांच्या अंत्यसंस्कारासमयी बारसे घाटावर करण्यात आली.


डॉ. भाऊ लोखंडे यांचे सवाल
सन २००० सालची घटना. नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी पहिल्या पाचमध्ये डॉ. भाऊ लोखंडे यांची निवड झाली होती. यावेळी तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांनी डॉ. लोखंडे यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी कुलगुरूपदासाठी इच्छुक असणाऱ्या उमदेवाराचे राजकीय पक्षाशी संबंध नको, ही अट आपल्याला माहिती नव्हती का, अशी विचारणा तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांनी डॉ. लोखंडे यांना केली होती. डॉ.भाऊ लोखंडे यांनी १९९० मध्ये रिपाइं आणि काँग्रेस युतीकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मुलाखतीदरम्यान डॉ. लोखंडे यांनी नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात आजपर्यंत अनुसूचित जाती जमातीपैकी कुलगुरू झालेले नाही. आपण यादृष्टीने न्याय द्याल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावर डॉ. अलेक्झांडर यांनी ‘तुम्हाला माहिती नाही का, कुलगुरू पदासाठी राजकीय संबंध असणे ही अपात्रता आहे.’ असे सांगितले होते. काही दिवसांपुर्वी खुद्द ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांनी हे प्रसंग सांगितला
विद्यमान कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही पुढाऱ्यांची भेट घेतल्यानंतर भाऊ लोखंडे यांनी त्यांचे अनुभव सांगून अप्रत्यक्षरित्या विद्यापीठ कायद्याकडे विद्यमान राज्यपालांचे लक्ष वेधले होते.

आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार डॉ. भाऊ लोखंडे यांचे निधन

मॉडेल टाऊनला वलय प्राप्त झाले
मॉडेल टाऊन ही उत्तर नागपुरातील वसाहत. डॉ. भाऊ लोखंडे या वस्तीत राहायला आले, त्यावेळी या वस्तीमध्ये झोपडीवजा घरं होती. सारी घरे कुडाची होती. डॉ. भाऊ लोखंडे येथे राहायला आले आणि हळूहळु आंबेडकरी चळवळीचे केंद्र उत्तर नागपून बनु लागले. मोर्चे, भाषणे, आंदोलने सुरू झाली. डॉ. भाऊ लोखंडे यांची प्रेरणादायी भाषणे सुरू झाल्यानंतर मॉडेल टाऊन या वस्तीला वलय प्राप्त झाले. अनेक जण शिकून मोठे झाले की, वस्ती सोडतात, परंतु डॉ. लोखंडे या वस्तीत राहात आहेत, यामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वाकडे बघून या वस्तीतील झोपड्या हळूहळू पडू लागल्या आणि त्याच जागेवर सुंदर बंगले बनू लागले. डॉ. लोखंडे यांच्यामुळे मॉडेल टाऊनला वलय प्राप्त झाले, हे मात्र नक्की.

संपादन - स्वाती हुद्दार