esakal | मनोरुग्णांचे थांबले सामाजिक पुनर्वसन, रुग्णांचीही संख्या रोडावली
sakal

बोलून बातमी शोधा

mentally disable patients decreases in nagpur

मनोरुग्णालयात रुग्णांना दररोज वॉर्डातच जेवण दिले जात होते. खाटेवर जेवण मिळत असल्याने अनेकदा मनोरुग्ण जेवत नसत. मात्र, अलीकडे 'बुफे' जेवणाचा आनंद मनोरुग्ण घेत होते.

मनोरुग्णांचे थांबले सामाजिक पुनर्वसन, रुग्णांचीही संख्या रोडावली

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : मागील वर्षभरात कोरोनामुळे मनोरुग्णांच्या सामाजिक पुनर्वसनाच्या उपक्रमांना थांबा लागला होता. यात सहभोजनाची सवय लागावी म्हणून मनोरुग्णांना जेवणाच्या 'बुफे' सिस्टिम, शेणखत तयार करणे, भाजीपाला पिकवण्यापासून तर 'कॅन्टीन'वर काम करण्याची संधी बरे झालेल्या मनोरुग्णांना देण्यात आली होती. मात्र, हे सारे उपक्रम आता हरवले आहेत. 

हेही वाचा - नवे महापौर दयाशंकर तिवारींपुढे आव्हानांचा डोंगर; पक्षाची ‘विकेट’ वाचविण्यासाठी लागणार...

मनोरुग्णालयात रुग्णांना दररोज वॉर्डातच जेवण दिले जात होते. खाटेवर जेवण मिळत असल्याने अनेकदा मनोरुग्ण जेवत नसत. मात्र, अलीकडे 'बुफे' जेवणाचा आनंद मनोरुग्ण घेत होते. सामाजिक पुनर्वसन करण्याचा प्रयत्न मनोरुग्णालय प्रशासनाने सुरू केला होता. टाटा ट्रस्टच्या सहकार्यातून मनोरुग्णालयात शेणखत तयार करण्याचा प्रकल्प सुरू झाला होता. मनोरुग्णालयातील अनेक रुग्ण हे शेतकरी कुटुंबातील होते. त्यांना जनावरे, माती-शेती यांच्याशी जोडले, तर ते लवकर बरे होतील या हेतूने वर्षभरापूर्वी मनोरुग्णांच्या मेहनतीवर पाच एकरची शेती फुलविली. भाजीपाला, पपईपासून तर केळीच्या बागाही सजविल्या होत्या. यातून अनेक रुग्णांना समाधान मिळत असल्याचे जाणवले होते. बरे झालेल्या रुग्णांना सुरक्षारक्षक म्हणून जबाबदारी देण्यापासून, तर याच परिसरात लावण्यात आलेल्या मोबाईल कॅन्टीनमध्ये बरा झालेला मनोरुग्ण काम करीत होता. मात्र, हा प्रकल्प कधी गुंडाळला हे कळलेच नाही.मनोरुग्णालयातील व्यवसायोपचार विभागाच्या वतीने मोमबत्ती बनवण्यापासून तर कागदी पाकीट, दरवाजे खिडक्यांची पडदे, पायदान अशा विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देखील देण्यात येत होते. परंतु, हे सारे थांबले असल्याची बाब प्रशासनाने मान्य केली आहे. 

हेही वाचा - 'त्या' चौघांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी फोडला टाहो; हिवरा-हिवरीत शोककळा; सरपंचांनाही...

साडेचारशे मनोरुग्ण दाखल - 
मनोरुग्णालयाची क्षमता सुमारे ९४० रुग्णांची आहे. मनोरुग्णालयात नेहमीच सहाशेपेक्षा अधिक मनोरुग्ण दाखल असायचे. मात्र, कोरोनाच्या साथीमुळे वर्षभरात अवघे साडेचारशेवर मनोरुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

बरे झाल्यानंतर सामान्य व्यक्तींप्रमाणेच मनोरुग्णांना जीवन जगण्याचा अधिकार आहे. मात्र, नातेवाईक त्यांना घरी घेऊन जात नसल्याने मनोरुग्णालय प्रशासनाकडून सामाजिक पुनर्वसनाचे प्रकल्प तयार करण्यात येतात. टाटा ट्रस्टच्या सहकार्यातून अनेक प्रकल्प राबवण्यात आले. मात्र, कोरोनाने त्याच्यावर पाणी पेरले. कोरोना गेल्यानंतर पुन्हा एकदा सामाजिक पुनर्वसनाचे उपक्रम सुरू करण्यात येतील. 
- डॉ. पुरुषोत्तम मडावी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर. 

go to top