अभिमानास्पद! सहा एकर शेत भाडेपट्ट्याने कसणारी विधवा ठरली आदर्श शेतकरी

The mercenary woman became the ideal farmer
The mercenary woman became the ideal farmer

सावनेर (जि. नागपूर) : कुटुंबाचा गाडा पुढे ढकलायचा म्हटले तर अनेकदा आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. मात्र, मनात जिद्द चिकाटी व परिश्रम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असल्यास उत्तमरित्या जबाबदारी पार पाडता येते. भाडेपट्याने शेती घेऊनही चांगले उत्पन्न मिळविता येते, असे म्हटले तर यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. मात्र, हे एका कष्टकरी महिलेने दाखवून दिले आहे. रेखा शेषरावजी ठाकरे असे या शेतकरी महिलेचे नाव आहे.

मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालवित असताना सोळा वर्षांपूर्वी रेखा यांच्या पतीचा वीज पडून मृत्यू झाला. त्यानंतर चार मुली व एक मुलगा यांचा सांभाळ करण्यासाठी मजुरी करण्यापेक्षा शेती व्यवसाय करण्याचे ठरवून गावातील एका शेतकऱ्याचे सहा एकर शेत भाडेपट्ट्याने घेऊन रेखा शेती करीत आहे. या शेतीतून त्यांनी मुला-मुलींचे संगोपन शिक्षण व मुलींचे लग्न करून आर्थिक प्रगती साधली आहे.

कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यानंतर रेख यांनी शेती कसून संसाराची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. नांदा ग्रामपंचायततर्फे या कर्तबगार महिलेचा सन्मान करण्यात आला. अशा बऱ्याच कर्तबगार होतकरू महिला ग्रामीण भागामध्ये आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, पंचायत समितीच्या सभापती अरुणाताई शिंदे, उपसभापती प्रकाश पराते, गटविकास अधिकारी अनिल नागणे, पंचायत समिती सदस्य गोविंदा ठाकरे, सरपंच विवेक मोवाडे, जिल्हा परिषद उपअभियंता हलगुले, सेलुटे, बिहारे आदी मान्यवरांसह उपसरपंच बालू वंजारी, ग्रामपंचायत सदस्य, पाटणसावंगी सूतगिरणीचे संचालक कांताराम भोयर, कुणाल सातपुते, ईश्वर घोडमारे, गणपतराव मिलमिले, दामू सातपुते, विजय सातपुते, नितीन भोयर आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

शेती व्यवसायातून प्रगती साधता येते
शेती व्यवसाय परवडत नाही म्हणून काही शेतकरी कर्जबाजारी आहेत. तर कोणी शेतीपासून दूर जात आहे. मात्र, शेती व्यवसायातून प्रगती साधता येते.
- रेखा ठाकरे, शेतकरी

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com