आयुक्त तुकाराम मुंढेंबद्दल एका मंत्र्याचे मोठे विधान... वाचा सविस्तर 

Tukaram Mundhe
Tukaram Mundhe

नागपूर  : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि पालिका प्रतिनिधी यांच्यातील वाद आज राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. त्याचा शहराच्या विकासावरदेखील दुष्परिणाम होत असल्याची ओरड होत आहे. याबाबत राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना बोलते केले असता ते म्हणाले की, सरकार म्हणून आम्ही आयुक्त तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांच्या पाठीशीच आहोत. 

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी या विषयावर एक प्रश्‍न त्यांना विचारला होता. त्यावर, तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्याच्या पाठीशी सर्वांनीच उभे राहिले पाहिजे, असे उत्तर त्यांनी दिले होते. त्यानंतर सोमवारी (ता. ३) महसूलमंत्री थोरात यांनी सुद्धा या प्रश्‍नावर तेच उत्तर दिले. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असल्याचे दिसते. मात्र, पालिका पदाधिकाऱ्यांनीही तेवढ्याच ताकतीने मुंढे यांचा विरोध कायम ठेवला आहे. शनिवारी (ता.१) झालेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत आयुक्तांना पुन्हा एकाकी पाडण्यात आले. पण तेवढ्याने मुंढे डगमगले नाहीत, असेच त्यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीवरून जाणवते. 

‘तो‘ आदेश फडणवीसांचाच 

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या बैठकीला जाऊ नये, हा आदेश आपला नव्हे तर फडणवीस सरकारच्या काळात खुद्द त्यांनीच दिलेला आहे. त्यांनी तेव्हा जे पेरले, तेच आता उगवले आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाबाबत विचारले असता, ‘त्या विषयावर माझा अभ्यास नाही, त्यामुळे उत्तर देणार नाही‘, असे म्हणत त्यांनी या प्रश्‍नाला बगल दिली. 

मुख्यमंत्री सहजतेने बोलणारे व्यक्तिमत्व 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहजतेने बोलणारे व्यक्तिमत्व आहे. समोरच्याला समजून घेण्याची त्यांची पद्धत उत्तम आहे. राज्यात सर्वांशीच त्यांनी चांगला संवाद ठेवला आहे. सरकारमधील मंत्र्यांशीच नव्हे तर सर्व आमदारांशी ते सातत्याने बोलत असतात. त्यांच्या क्षेत्रातील समस्या जाणून घेऊन, त्यावर समाधान शोधण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. सोबतच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशीही ते नेमाने संवाद साधत असतात. त्यामुळे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांमध्ये संवाद नाही, हा आरोप थोरात यांनी खोडून काढला. 

वीज बिलात सवलत देण्यासाठी प्रयत्न 

लॉकडाउनच्या तीन महिन्यांमध्ये राज्यातील वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिल देण्यात आले. त्याचा राज्यभर विरोध केला जातोय. याबाबत विचारले असता, वीज ग्राहकांना बिलामध्ये सवलत कशी देता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासोबत या विषयावर चर्चा करणार असल्याचे थोरात म्हणाले.  
 

संपादन - राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com