"माकड' उडया बेतल्या जीवावर, चिरले पोट, पुढे घडले..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या या वानराला प्रमोद रघुशे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळीच औषधोपचाराची सोय करून जीवदान दिले. 

भिवापूर (जि.नागपूर) :उडी घेण्याचा अंदाज चुकल्याने घराच्या छतावर लागलेल्या टिनाच्या टोकदार पत्र्याने एका मोठ्या माकडाचे पोट चिरले. ही जखम इतकी मोठी होती की पोटाच्या आतील भाग शरीराबाहेर लोंबकळून त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या होत्या. ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास येथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या वडध या गावात घडली. मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या या वानराला प्रमोद रघुशे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळीच औषधोपचाराची सोय करून जीवदान दिले. 

क्‍लिक करा : अबब !तब्बल एक लाख 15 हजारांचा आकडा 

मरणासन्न अवस्थेतील वानराला दिले जीवदान 
जखमेतून उठणाऱ्या वेदनेने वानर विव्हळू लागले होते. रक्ताने माखलेले शरीर घेऊन ते कसेबसे गावाच्या मध्यभागी असलेल्या चबुतऱ्यापर्यंत पोहोचले. अती रक्तस्त्राव झाल्याने पुढे जाण्यासाठी शरीरात त्राण उरले नव्हते. अशात गावातील काही युवकांची नजर या वानरावर पडली. त्यांच्यातील करुणा जागली. त्यांनी लगेच येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. राऊंड ऑफिसर नंदेश्वर व त्यांचे सहकारी कामडी यांनी क्षणाचाही विलंब न करता वडध गाव गाठले. मरणासन्न अवस्थेत पडलेल्या जखमी वानराला पाहून त्यांचेही मन गहिवरून आले. त्यांनी वानराजवळ जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु तशाही अवस्थेत वानराने तिथून पळ काढला. वानर आपल्याला सहजासहजी सापडणार नाही, हे जाणून नंदेश्वर यांनी भिवापूर येथील प्रमोद रघुशे यांच्याशी संपर्क साधला. शेतात पिकांवर औषधांची फवारणी करीत असलेले रघुशे यांनी हातचे काम टाकून आपल्या सहकाऱ्यांसह वडधला धाव घेतली. त्यांनी सोबत नेलेल्या जाळीच्या साहाय्याने वानराला पकडण्यात आले. 

क्‍लिक करा : आता पदव्यांसाठीही वाट्‌टेल ते ... 

जखमी माकडावर केले उपचार 

मालवाहू वाहनात टाकून त्याला येथील पशुचिकित्सालयात आणले. या ठिकाणी उपस्थित डॉक्‍टरांनीे वानराची जखम व्यवस्थित धुऊन कापलेला पोटाचा भाग शिवून काढला. त्याच्यावर आवश्‍यक तो औषधोपचार केला. यावेळी प्रमोद रघुशे व त्यांच्या सात-आठ सहकाऱ्यांनी वानराला घट्ट धरून ठेवले होते. उपचारानंतर वानराला थोडे हायसे वाटायला लागले होते. काही वेळानंतर वानराला येथील मशाडोंगरी तलाव परिसरात सोडण्यात आले. वानराला जीवदान देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्यांत सर्पमित्र संघटनेचे प्रमोद रघुशे, प्रकाश मांढरे, मनोज वाढई, दुर्गेश बटघरे, स्वप्निल वाघमारे, सुभाष वाघमारे, रवी मांढरे आदींचा सहभाग आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "The monkey flew to a broken life, to a broken stomach.