विद्युत महामंडळाच्या अधिकारी संघटनेच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय, ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन

योगेश बरवड
Sunday, 11 October 2020

महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सुनील पाठक, सरचिटणीस मनोज ठवरे, संघटन सचिव संजय खाडे, सहसचिव धैर्यशील गायकवाड, गणेश बोढरे, औरंगाबाद परिमंडळ उपाध्यक्ष प्रणेश शिरसाट यांच्या शिष्टमंडळाने डॉ. राऊत यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली.

नागपूर : महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही विद्युत कंपन्यांतील अतांत्रिक अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या अधिकारी संघटनेला दिले.

हेही वाचा - 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' योजनेतील ऑनलाइन प्रक्रियेत अडथळे, तंत्रज्ञही फोन उचलत नाहीत

संघटनेचे अध्यक्ष सुनील पाठक, सरचिटणीस मनोज ठवरे, संघटन सचिव संजय खाडे, सहसचिव धैर्यशील गायकवाड, गणेश बोढरे, औरंगाबाद परिमंडळ उपाध्यक्ष प्रणेश शिरसाट यांच्या शिष्टमंडळाने डॉ. राऊत यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली. त्यावेळी संघटनेच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) व वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) या पदामध्ये वेतन निश्चितीदरम्यान झालेली अनियमितता दूर करावी. मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) व मुख्य महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) ही दोन वर्षांपासून रिक्त असलेली महत्त्वाची पदे पदोन्नतीद्वारे त्वरित भरावीत. अतांत्रिक अधिकाऱ्यांचे प्रलंबित पदोन्नती पॅनल त्वरित घेऊन रिक्त पदे भरावीत. सांघिक कार्यालयातील देयके व महसूल विभागात लेखा संवर्गाची विविध पदे नव्याने मंजूर करावीत. अंतर्गत लेखा परीक्षण विभाग महावितरण कंपनीमध्ये पूर्वीप्रमाणेच सुरू करावा. औद्योगिक संबंध व जनसंपर्क संवर्गातील वेतन करारादरम्यान वेतनश्रेणीतील झालेल्या तफावती दूर कराव्यात, अशा विविध मागण्या अधिकारी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे आश्वासन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी या शिष्टमंडळाला दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mseb officer problem will solve says energy minister nitin raut