मुंबई, हावडा व अहमदाबादकडे जाणाऱ्या प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा 

योगेश बरवड
Monday, 5 October 2020

कोरोनाच्या संकटामुळे नियमित प्रवासी रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सुविधेनुसार मर्यादित संख्येने स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. सुरू असणाऱ्या गाड्यांमधील लांबलेली प्रतीक्षायादी लक्षात घेता नियमित गाड्या सुरू करण्याबाबत मंथन सुरू आहे.

नागपूर : अनलॉक ५ प्रक्रियेअंतर्गत नियमित रेल्वेगाड्या चालविण्याचे सुतोवाच भारतीय रेल्वेने केले आहे. पण, अजूनही त्यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. प्रवाशांची निकड लक्षात घेऊन काही स्पेशल ट्रेन दररोज चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नागपूरमार्गे धावणारी मुंबई -हावडा व हावडा अहमदाबाद ट्रेन आता दररोज धावणार असल्याने मुंबई, हावडा व अहमदाबादकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे नियमित प्रवासी रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सुविधेनुसार मर्यादित संख्येने स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. सुरू असणाऱ्या गाड्यांमधील लांबलेली प्रतीक्षायादी लक्षात घेता नियमित गाड्या सुरू करण्याबाबत मंथन सुरू आहे. पण, अद्याप त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. आता साप्ताहिक किंवा द्विसाप्ताहिक तत्वावर धावणाऱ्या काही गाड्या ‘डेली बेसीस’ चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

हेही वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला
 

त्यात नागपूरमार्गे आठवड्यातून तीन दिवस धावणाऱ्या चार गाड्या आता दररोज धावतील. ०२८१० हावडा - मुंबई विशेष मेल मंगळवारपासून दररोज हावडा येथून रवाना होईल. ०२८०९ मुंबई - हावडा विशेष रेल्वे ८ ऑक्टोबरपासून. ०२८३४ हावडा - अहमदाबाद विशेष रेल्वे बुधवार (ता.७) पासून, ०२८३३ अहमदाबाद - हावडा विशेष रेल्वे १० ऑक्टोबरपासून दररोज नियोजित वेळेनुसार धावेल. या गाड्यांना टाटानगर व चक्रधरपूर स्थानकावरही थांबा देण्यात आला आहे.
 
खुर्दा रोड- गांधीधाम साप्ताहिकच्या वेळापत्रकात बदल

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणाऱ्या ०२९७४ खुर्दा रोड- गांधीधाम स्पेशल ट्रेनच्या वेळापत्रकात आंशिक बदल करण्यात आला आहे. त्यानुसार ही गाडी बडनेरा स्थानकावर सकाळी १०.३०, अकोला स्थानकावर ११.४० वाजता व भुसावळ स्थानकावर दुपारी २ वाजता पोहोचेल.
 

नागपूरगार्गे गोरखपूर-सिकंदराबाद अतिरिक्त स्पेशल ट्रेन

नागपूरमार्गे गोरखपूर-सिकंदराबाद- गोरखपूर स्पेशल ट्रेन चालविली जाणार आहे. ०२५८९ गोरखपूर- सिकंदराबाद स्पेशल ६ ऑक्टोबरपासून प्रत्येक मंगळवारी तर ०२५९० सिकंदराबाद-गोरखपूर स्पेशल ११ ऑक्टोबरपासून प्रत्येक रविवारी मूळ स्थानकावरून रवाना होईल. पुढील सूचनेपर्यंत ही सेवा सुरूच राहील. ०२५८९ गोरखपूर - सिकंदरबाद ट्रेन मंगळवारी सकाळी ६.३५ वाजता गोरखपूरहून रवाना होईल. बुधवारी मध्यरात्री ३.५५ वाजता नागपूरला पोहोचेल आणि दुपारी ३ वाजता सिकंदराबाद स्थानक गाठेल. याचप्रमाणे ०२५९० सिकंदरबाद - गोरखपूर विशेष ट्रेन रविवारी सकाळी ७.२० वाजता सिकंदरबादहून रवाना होईल. सायंकाळी ५.०५ वाजता नागपूरला पोहोचेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.०५ वाजता गोरखपूर स्थानक गाठेल. या गाडीला खलीलाबाद, बस्ती, मनकापूर, गोंडा, बाराबंकी, बादशाहनगर, ऐशबाग, उन्नव, कानपूर सेंट्रल, पोखरण, उरई, झाशी, ललितपूर, भोपाळ, इटारसी, घोडाडोंगरी, बेतूल, आमला, सेवाग्राम, चंद्रपूर, बलारशा, सिरपूर कागजनगर, बेलमपल्ली, मंचेरियल, रामागुंडम, काजीपेठ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. यागाडीला ११ स्लिपर, एक द्वितीय श्रेणी वातानुकूलित, चार तृतीय श्रेणी वातानुकूलित डबे राहतील. 

संपादन  : अतुल मांगे  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai-Howrah Howrah-Ahmedabad trains now run daily