दोघे सोबत आले, मिळून दारू प्यायले, क्षुल्लक कारणावरून झाला वाद आणि...

बुधवार, 27 मे 2020

सुनील सकाळी बाजारातील काम संपवून दुपारी घरी परतत असताना आरोपी शशांक त्याला वाटेत भेटला. त्यानंतर दोघेही दारू पिण्याकरिता गेले.

नागपूर : मद्यधुंद अवस्थेत फिरताना एका मित्राने दुसऱ्या मित्राचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास खापरी बाजार परिसरात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

सुनील सुशील यादव (32, रा. खापरी) असे मृताचे नाव आहे. शशांक मोहुर्ले असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील यादव हा कॉटन मार्केट परिसरातील संत्रा बाजार परिसरात काम करीत होता. आरोपी बेरोजगार आहे.

सुनील सकाळी बाजारातील काम संपवून दुपारी घरी परतत असताना आरोपी शशांक त्याला वाटेत भेटला. त्यानंतर दोघेही दारू पिण्याकरिता गेले. खापरी बाजार परिसरातील एका दारूच्या दुकानातून दारू प्यायली.

लॉकडाऊनच्या काळात वाढल्या तक्रारी, मग मद्यविक्री दुकानदारांना बसला हा फटका

त्यानंतर तेथेच एका दुकानाजवळ बसले होते. दरम्यान, बडेजाव करण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादात शशांक याने दगडाने सुनीलच्या डोक्‍यावर वार केला. अधिक रक्तस्राव झाल्याने सुनील याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती सोनेगाव पोलिसांना मिळाली.

त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला. त्यानंतर पळून गेलेल्या आरोपीचा शोध घेतला व अटक केली, अशी माहिती पोलिस उपायुक्त विवेक मासळ यांनी दिली.