'पी साले दारू' म्हटल्याने काल्याने मारायला आणला हातोडा; आणि नंतर घडले भयानक... 

शुक्रवार, 12 जून 2020

त्यांचा पुन्हा वाद उफाळला. वाद वाढतच गेल्याने संतापलेल्या दोन मित्रांनी सुरेंद्रच्या डोक्‍यावर हातोड्याने वार करून त्याला रक्तबंबाळ केले. रक्ताच्या थारोळ्यात लोळवताच त्यांनी पळ काढला. सुरेंद्रचा जागीच मृत्यू झाला.

नागपूर : गुन्हेगारी जगतात सक्रिय असलेले तीन मित्र दारू पीत बसले होते. दारूचे ग्लास भरण्यावरून तिघांमध्ये वाद झाला. दोघा मित्रांनी एकाचा हातोड्याने ठेचून खात्मा केला आणि पळ काढला. हा थरार आज दुपारी साईनगरात घडला. काल्या ऊर्फ सुरेंद्र सुखदेव तभाणे (वय 32, साईनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर जल्या ऊर्फ दीपक किसनलाल सोनी आणि शेख जलील ऊर्फ बाबा पन्नी अशी आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कायदा व सुव्यवस्था पुन्हा बिघडली आहे. कारागृहातून सुटका झालेले काही गुन्हेगार शहरातच मोकाट फिरत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून बेरोजगार आणि आर्थिक चणचण असल्याच्या स्थितीत गुन्हेगारांनी दिवस काढले आहेत. त्यामुळे लॉकडाउन संपताच कारागृहातून सुटलेले आणि लॉकडाउनमध्ये अंडरग्राउंड असलेले गुंड गुन्हेगारीत भर घालीत आहेत. त्यामुळे शहरात चोरी, लूटपाट, हत्या, घरफोडी आणि फसवणुकीच्या घटनांत वाढ झाली आहे. गेल्या 11 दिवसांत 9 हत्याकांड घडले आहेत. त्यावरून पोलिसांचा वचक संपल्याचे संकेत मिळत आहेत.

सुरेंद्र तभाणे हा आठवडीबाजाराच्या ठिकाणी जाऊन हॉटेल लावत होता. त्याला पत्नी आणि दोन मुले आहेत. तो लॉकडाउन काळात सारेच बंद असल्याने घरी होता. आता लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्याने त्यानेही आपले दुकान सुरू केले होते. त्याचे मित्र बाबा पन्नी, जल्या ऊर्फ दीपक सोनी यांच्यासोबत सकाळपासूनच घरी दारू पीत होता. दारूची नशा चढत गेल्याने त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. घरात शिवीगाळ होत असल्याने सुरेंद्रची पत्नी त्यांच्यावर रागावली.

हेही वाचा : किती बॉयफ्रेंड आहेत तुला, मित्राने केली विचारणा आणि...

काही वेळातच तिघेही घराबाहेर निघाले. घराजवळच असलेल्या एका मंदिर परिसरातील मोकळ्या मैदानावर गेले. पुन्हा तिथे दारूची मैफल जमविली. त्यांचा पुन्हा वाद उफाळला. वाद वाढतच गेल्याने संतापलेल्या दोन मित्रांनी सुरेंद्रच्या डोक्‍यावर हातोड्याने वार करून त्याला रक्तबंबाळ केले. रक्ताच्या थारोळ्यात लोळवताच त्यांनी पळ काढला. सुरेंद्रचा जागीच मृत्यू झाला. हत्याकांडाची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. पाहता पाहता लोकांची गर्दी वाढत गेली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. शांतीनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटकेसाठी शोध सुरू केला. 

फुकट की दारू हैं... पी साले! 
बाबा पन्नी आणि जल्या यांनी "फुकट की दारू हैं... पी साले' असे म्हणून चिडवले होते. मात्र, काल्याने या शब्दावरून वाद घालून शिवीगाळ केली. त्यानंतर तो पळतच घरात गेला आणि त्याने हातोडा आणला. जल्या आणि पन्नीला जीव घेईल, अशी भीती वाटली. त्यामुळे दोघांनीही त्याच्या हातातील हातोडा हिसकावून काल्याचा मुडदा पाडला.