ठेक्‍याने घेतलेल्या शेताच्या पैशांचा झाला डोंगर... मग उचचले हे पाऊल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

पोलिस अशोक यांचा शोध घेत असताना पुतन्या रोशन वाडीभस्मे याने भगवान डोकरीमारे (रा. काचुरवाही) याच्यावर संशय व्यक्‍त केला. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. यावेळी अशोक यांचा खून केल्याचे भगवान याने कबुल केले. यात दोन आरोपींनी त्याला मदत केली असून, हेमराज भलमे (रा. रामटेक) व गोपीचंद तारतर्पे (रा. खोळगाव) अशी आरोपींची नावे आहेत.

रामटेक (जि. नागपूर) : रामटेक तालुक्‍यातील काचुरवाही येथील पोस्ट मास्टर अशोक धनीराम वाडीभस्मे (54) हे सहा जानेवारीला काचुरवाही येथून अचानक बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही त्यांचा कोणताही थांगपता लागला नाही. शेवटी कुटुंबीयांनी रामटेक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. चार दिवसांनी म्हणजे गुरुवारी (ता. 9) त्यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात पुरलेला आढळला. पैशाच्या वादातून त्यांची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली.

Image may contain: plant, tree, outdoor and nature
याच खड्ड्यात पुरला होता मृतदेह

अशोक वाडीभस्मे हे काचुरवाही येथील डाक कार्यालयात कार्यरत होते. ते काचुरवाही येथील रहिवासी असून, सहा वर्षांपासून मुलांच्या उच्च शिक्षणासाठी नागपूर येथे राहत होते. नोकरी, घर व शेती काचुरवाहीला असल्याने ते रोज सकाळी रेल्वेने रामटेक आणि रामटेकवरून काचुरवाहीला येत होते. कार्यालयीन कामकाज आटोपून ते नागपूरला परत जात होते. नेहमीप्रमाणे ते सोमवारी सकाळी काचुरवाहीला आले आणि पोस्टाचे कामकाज आटोपून घरी जाण्यासाठी निघाले. नागपूरला जाण्यापूर्वी त्यांनी काचुरवाहीचा सोमवारचा आठवडी बाजार केला. मात्र, यानंतर ते अचानक बेपत्ता झाले.

हेही वाचा - Video : एक स्वागत समारंभ असाही... वाचा काय आहे विशेष

ते अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबासह गावात खळबळ उडाली. तसेच त्यांचा फोनही बंद होता. यानंतर अशोक वाडीभस्मे यांच्या मुलगा सुभाष वाडीभस्मे व पुतन्या रोशन वाडीभस्मे यांनी रामटेक पोलिस ठाण्यात अशोक यांच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. रामटेक आणि अरोली पोलिसांनी तपासाची चक्र फिरवित त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

Image may contain: 1 person, eyeglasses
मृत अशोक धनीराम वाडीभस्मे

पोलिस अशोक यांचा शोध घेत असताना पुतन्या रोशन वाडीभस्मे याने भगवान डोकरीमारे (रा. काचुरवाही) याच्यावर संशय व्यक्‍त केला. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. यावेळी अशोक यांचा खून केल्याचे भगवान याने कबुल केले. यात दोन आरोपींनी त्याला मदत केली असून, हेमराज भलमे (रा. रामटेक) व गोपीचंद तारतर्पे (रा. खोळगाव) अशी आरोपींची नावे आहेत. तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून, आणखी काही आरोपींचा समावेश आहे का या दिशेने तपास करीत आहेत. खड्ड्यातून मृतदेह काढल्यानंतर रामटेक येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.

Image may contain: 1 person, standing, grass, tree, plant, outdoor and nature

 

पैशाच्या वादातून केला खून

अशोक वाडीभस्मे हे जास्त वेळ गावात राहत नसल्याने त्यांनी आपले शेत मुख्य आरोपी भगवान डोकरीमारे याला ठेक्‍याने दिले होते. ठेक्‍याचे पैसे अधिक झाल्याने अशोक तगादा लावत होते. मात्र, आरोपी डोकरीमारे पैसे देत नव्हता. सततच्या तगाद्याला कंटाळून त्याने सोमवारी अशोक यांना शेतात बोलावले. दोन साथीदारांच्या मदतीने अशोक यांचा गळा दाबून ठार मारले. यानंतर मृतदेह त्यांच्यात शेतात पुरला.

Image may contain: plant, tree, sky, grass, outdoor and nature

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder in Nagpur over money laundering