नागपुरात मेट्रो स्टेशनवर रंगली सुरांची मैफल; प्रवाशांची सायंकाळ श्रवणीय

राजेश प्रायकर
Tuesday, 1 December 2020

शहरातील उदयोन्मुख कलावंतांच्या उपजत कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देत महामेट्रोने सिताबर्डी येथील इंटरचेंज स्टेशनवर बॅन्ड स्टॅन्ड तयार केले. आज महामेट्रो व सूरसंगमतर्फे सिताबर्डी स्टेशनवर संगीताचा कार्यक्रम पार पडला. 

नागपूर ः रुळावरून धावणाऱ्या मेट्रोचा आवाज ऐकू येणाऱ्या सिताबर्डी येथील इंटरचेंज स्टेशनवर आज श्रवणीय गाणे ऐकून प्रवाशांनाही धक्का बसला. अनेकांचे पाय स्टेशनवरील बॅंड स्टॅन्डकडे वळले. प्रथमच मेट्रोच्या स्टेशनवर रंगलेल्या सुरांच्या मैफलीत प्रवासीही सामील झाले.

शहरातील उदयोन्मुख कलावंतांच्या उपजत कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देत महामेट्रोने सिताबर्डी येथील इंटरचेंज स्टेशनवर बॅन्ड स्टॅन्ड तयार केले. आज महामेट्रो व सूरसंगमतर्फे सिताबर्डी स्टेशनवर संगीताचा कार्यक्रम पार पडला. 

अधिक वाचा - सोयाबीनचे दर वधारले; उच्च दर्जाच्या सोयाबीनलाही कमी भाव 

सचिन आणि सुरभी ढोमणे या शहरातील गायक जोडीने सहकलाकारांसोबत सुमारे एक तास विविध गीतांचे रंग उधळले. विशेष म्हणजे यावेळी उदयोन्मुख कलावंतांना वाव देण्यात आला. त्यांनी हिंदी, मराठी एकापेक्षा सरस गाणी सादर करून मेट्रो प्रवाशांना खिळवून ठेवले. 

मंगेश देशपांडे, श्रीया मेंढी, रिषभ ढोमणे यांनी देशभक्तीपर, शास्त्रीय संगीत तसेच सुगम संगीतातील एक-एक मोती सादर केले. महामेट्रोतर्फे प्रथमच अशाप्रकारचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता सीताबर्डी इंटरचेन्ज स्टेशनवर विशेषत्वाने बँड स्टॅन्ड तयार करण्यात आला आहे. इतर मेट्रो स्टेशनवरही बॅंड स्टॅन्ड तयार करण्यात येणार आहे. सूर संगम ग्रुपने मेट्रोमध्ये असे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत पालकत्व स्वीकारले आहे.

जाणून घ्या - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला

उदयोन्मुख कलावंता संधी

मेट्रो स्टेशनवर कार्यक्रम सादर करण्यासाठी इच्छुक कलावंतांनी महामेट्रो प्रशासन किंवा सूरसंगमच्या कलावंतांसोबत संपर्क करण्याचे आवाहन मेट्रो अधिकाऱ्यांनी केले आहे. नागपूरकरांनी या उपक्रमातून उपजत कलेला वाव देण्यासाठी पुढाकार घेण्याचेही आवाहन महामेट्रोने केले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Musical ceremony done on metro station in Nagpur