संगीतम्‌ नाटकम्‌ रम्यम्‌ सद्य: परमानन्ददायकम्‌

kalidas mahotsav
kalidas mahotsav

नागपूर : प्रसिद्ध ओडिशी नृत्यांगना सुश्री मोहांती यांच्या अप्रतिम नृत्याभिनयाची नागपूरकरांवर मोहिनी कायम असतानाच नुरान सिस्टर्सने खड्या आवाजात "अल्ला हू, अल्ला हू' कव्वाली सादर केली अन्‌ रसिक दंग झाले. युवा गायक आदित्य खांडवे यांच्या गायनकलेला रसिकांनी भरभरून दाद दिली. कालिदास महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

आदित्य खांडवे यांनी गायलेल्या "अमन काहे को सोच करे...'ला रसिकांनी भरभरून दाद दिली. तबल्यावर संदेश पोपटकर, संवादिनीवर श्रीकांत पिसे, तानपुऱ्यावर मयूर पटाईत आणि रुद्रप्रताप दुबे यांची त्यांना साथ मिळाली. दुसऱ्या सत्रात ओडिशी नृत्यांगना सुश्री मोहांती यांनी सादर केलेले नृत्य मनोहारी होते. कवी कालिदास यांच्या ऋतुसंहार महाकाव्यावर आधारित आषाढस्य प्रथमदिवसे या नृत्याने त्यांनी रंगमंचावर पदार्पण केले.

भरतनाट्यम आणि कथ्थकचा सुरेख मेळ त्यांनी साधला. अष्टपदीवर आधारित खंडिता युवती विलापम्‌ हे राधाकृष्णाचे रसभाव व सूर्याष्टकाचे त्यांनी कौशल्याने सादरीकरण केले. व्हायोलिनवर गुरू रमेशचंद्र दास, बासरीवर गुरू जवाहर मिश्रा, पखावजवर गुरू दिवाकर परिडा यांनी साथ दिली तर बोल गुरू सुखांत कुमार कुंडू यांचे होते. नुरान सिस्टर्सच्या सादरीकरणाने रसिक दंग झाले. संचालन श्‍वेता शेलगावकर व रेणुका देशकर यांनी केले. आभार सुधाकर तेलंग यांनी मानले.
समारोपीय कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांच्यासह नासुप्रच्या अध्यक्ष शीतल उगले, उपायुक्त सुधाकर तेलंग, आयुक्‍त डॉ. संजीवकुमार, वस्त्रोद्योग संचालक माधवी खोडे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते. विदर्भातील प्रशासकीय अधिकारी आपला सांस्कृतिक वारसा निष्ठेने जपत आहेत. त्यांचे कौतुक करतो व शुभेच्छा देतो असे केदार म्हणाले.

पुढील वर्षी मालविकाग्निमित्रम

संस्कृत कवी कुलगुरू कालिदास यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी होणारा पुढील वर्षीचा कालिदास सांस्कृतिक महोत्सव "मालविकाग्निमित्रम' या पाच अंकी नाटकावर आधारित असेल अशी घोषणा सुधाकर तेलंग यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com